दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये झालेला संघर्ष मुंबईकरांनी पाहिला आहे. या मतदारसंघात नेहमी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होते. काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरा यांचा पराभव केला आहे. तसेच शिवसेनेतील फुटीनंतरही अरविंद सावंत हे ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांनाच तिकीट मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा नाराज आहेत. लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी मिलिंद देवरा आता पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

महायुतीत दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळणार असल्याने मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा आपल्याला मिळावी, अशी शिंदे गटाची इच्छा आहे. तसेच भाजपादेखील या जागेसाठी अग्रही आहे. त्यामुळे भाजपादेखील देवरा यांना त्यांच्या पक्षात घेण्यास उत्सूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दक्षिण मुंबईच्या मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटात संघर्ष सुरू झाला असल्याचं बोललं जात आहे.

मिलिंद देवरा सलग दोन वेळा (२००४, २००९) या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांचे वडील मुरली देवरा हे चार वेळा दक्षिण मुंबईतून खासदार झाले होते. त्यामुळे मुंबईच्या आणि दिल्लीच्या राजकारणात देवरा यांचं वजन आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटाचा दिल्लीत कोणीही प्रसिद्ध चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटाने देवरा यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्याचं ठरवलं आहे.

हे ही वाचा >> “पंतप्रधान गद्दारांच्या घराणेशाहीवर बोलले नाहीत”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा कोणत्या पक्षाला दिली जाणार याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.” शिंदे सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.