लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीयदृष्टय़ा मागे पडलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन झाले असले तरी त्यांच्या या नियुक्तीचा काँग्रेसला सोलापूरमध्ये कितपत फायदा होतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती म्हणजे शरद पवार, लातूर विलासराव देशमुख, सिंधुदुर्ग नारायण राणे तसेच सोलापूर म्हणजे सुशीलकुमार शिंदे ही राज्याच्या राजकारणातील समीकरणे तयार झाली होती. या नेत्यांवरून त्यांच्या गावांची ओळख निर्माण झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांचे गेले चार दशके सोलापूरमध्ये वर्चस्व होते. शिंदे यांच्या शब्दाप्रमाणे स्थानिक राजकारण चालत असे. महानगरपालिकेत काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. हा अपवाद वगळता अनेक वर्षे सोलापूरमध्ये शिंदे निवडणुकीत उतरल्यावर त्यांचा विजय निश्चित असायचा. २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांची कन्या प्रणिती यासुद्धा विजयी झाल्या होत्या.

लोकसभेचे नेते आणि गृहमंत्रिपद भूषवीत असतानाही शिंदे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती. त्यात शिंदे यांच्याकडे इतके वर्षे नेतृत्व असूनही सोलापूरचा विकास झाला नाही यावर मोदी यांनी भर दिला होता. मोदी लाटेत शिंदे यांचाही पराभव झाला. पराभवापासून शिंदे राजकीयदृष्टय़ा काहीसे मागे पडले होते. गेल्याच आठवडय़ात पक्षाने त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी सोपविली आहे. हिमाचलमध्ये पुढील वर्षांच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग हे ज्येष्ठ नेते असून, राज्यातील अन्य नेत्यांसमवेत त्यांचे फारसे जमत नाही. यामुळेच शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे हिमाचलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिंदे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली असली तरी त्यांच्या मूळ सोलापूरमध्ये पक्षात किती फरक पडतो याची चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. जिल्हा परिषदेतही काँग्रेसची साफ धूळदाण उडाली. शिंदे यांचे अनेक जुने सहकारी पक्ष सोडून गेले. सोलापूर काँग्रेसमध्ये जानच उरलेली नाही. सारी मरगळ आली आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता शिंदे यांना आधी पक्षात जान आणावी लागेल. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करावे लागेल. विरोधात असले तरी अजूनही सोलापूरमध्ये प्रबळ विरोधकांची भूमिका काँग्रेसला वटवता आलेली नाही. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते भरकटले आहेत. या पाश्र्वभूमीवर सोलापूर काँग्रेसला शिंदे यांच्यामुळे किती बळ मिळणार हा मुख्य प्रश्न आहे. शिंदे यांनी लक्ष घातले तरच पक्ष उभारी घेऊ शकतो.

शिंदे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली असली तरी त्यांच्या मूळ सोलापूरमध्ये पक्षात किती फरक पडतो याची चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. जिल्हा परिषदेतही काँग्रेसची साफ धूळदाण उडाली. शिंदे यांचे अनेक जुने सहकारी पक्ष सोडून गेले. सोलापूर काँग्रेसमध्ये जानच उरलेली नाही. सारी मरगळ आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushilkumar shinde appointed as congress general secretary
First published on: 29-07-2017 at 02:32 IST