scorecardresearch

“एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन”, संजय शिरसाटांच्या विधानावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या…

“संजय शिरसाट यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि परळीत तक्रार दाखल करून घेतली नाही”

Sanjay Shirsat sushma andhare
"एकही अश्लील शब्द वापरल्यास राजीनामा देईन", संजय शिरसाटांच्या विधानावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या…

शिवसेना आमदार ( शिंदे गट ) संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत,’ असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. यावरून सुषमा अंधारेंनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर, अपमान केल्याचं सिद्ध झाल्यास राजीनामा देईल, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“माझा व्हिडीओ फिरत आहे. पण, त्यात कुठं अपमान केला माहिती नाही. सुषमा अंधारेंबाबत एकही अश्लील शब्द वापरल्याचं सिद्ध करून दाखवावं. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईल. तसेच, महिलेचा अपमान झाल्याचं सांगतात. मग महिलेने महिलेसारखं बोलावं,” असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला आहे.

हेही वाचा : मुंबईत ७२ व्या मजल्यावर कोणासाठी फ्लॅट घेतला?” रूपाली पाटलांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“मी अबला नाही वगैरे काही नाही”

याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमदारकीचा राजीनामा देईल, सत्ता त्यागेन असं म्हणणं इतके सोप्प असतं, तर या लोकांनी सुरत, गुवाहाटी हा प्रवासच केला नसता. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा अशा लोकांच्या तोंडी अजिबात शोभत नाही. मी अबला नाही वगैरे काही नाही. परंतु, वारंवार महिलांबाबत बेताल वक्तव्य शिंदे गटाकडून होत राहतात.

“ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही घोटाळ्यात गुंतवता येत नसल्याने बाईपणावर हल्ले करणं जास्त सोप्पं त्यांना वाटत. मात्र, संजय शिरसाट यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकणार आहे,” असेही सुषमा अंधारेंनी सांगितलं.

हेही वाचा : “फडणवीसांच्या आदेशानेच पहिल्यांदा बंडखोरी केली”, तानाजी सावंताच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“महिला आयोगाकडे ही तक्रार…”

“संजय शिरसाट यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि परळीत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे महिला आयोगाकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली आहे. महिला आयोगाने पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याचे निर्देश दिल्याचं समजतं,” अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 19:56 IST

संबंधित बातम्या