शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळात त्यांच्यावरील अश्लाघ्य वक्तव्यावर प्रश्न विचारला नाही, अशी तक्रार केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडा, असं म्हटलं. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “तो कार्यक्रम पूर्णपणे अराजकीय कार्यक्रम होता. ज्या भटक्या विमुक्तांच्या संघटनेचा तो कार्यक्रम होता त्याचे शरद पवार गेले ४० वर्ष पालक आणि सल्लागार म्हणून काम करतात. पहिली गोष्ट त्यात अजित पवारांचा उल्लेखच नाही. ते गाऱ्हाणं विरोधी बाकावरील सर्वच लोकांसाठी होतं.”
“आम्हाला अजिबात परकं करू नये”
“अजित पवारांना सांगितलं पाहिजे की, तुम्ही आमचे हक्काचे आहात, जवळचे आहात. तुमच्याजवळ आम्ही खूप आपुलकीने बोलतो. महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. त्या दिवशी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यांनी आमच्याजवळ का बोलता असं म्हणून आम्हाला अजिबात परकं करू नये,” असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.
“मी अजित पवार यांचा उल्लेखच केला नव्हता”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “त्या कार्यक्रमात मी अजित पवार यांचा उल्लेखच केला नव्हता. मी असं म्हणतेय की, ज्या सभागृहात मी सदस्य नाही, जिथे मी बोलू शकत नाही, तिथं माझ्यावतीने सभागृहात विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलावं. अजित पवार एकटेच विरोधी पक्षातील नेते आहेत का? सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली या माध्यमांनी केलेल्या बातम्या आहेत. मात्र, मी व्यक्त केलेली अपेक्षा सर्वांकडून आहे. अगदी विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या आमच्या नीलम गोऱ्हे यांच्याकडूनही ही अपेक्षा आहे.”
हेही वाचा : VIDEO: शरद पवारांसमोर ढसाढसा रडत सुषमा अंधारेंकडून तक्रार, अजित पवार म्हणाले, “काका रे…”
“अजित पवार आमच्या हक्काचे आहेत”
“अजित पवार मला का बोलत आहात असं म्हणत आहेत. मात्र, ते आमच्या हक्काचे आहेत. त्यांच्यावर आमचा अधिकार आहे, ते आमचे आहेत आणि अत्यंत आपुलकीने आम्ही त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी आम्हाला परकं करू नये,” असंही सुषमा अंधारेंनी नमूद केलं.