ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना सोमवारी घडली. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली आहे. रोशनी शिंदे काम करत असलेल्या कंपनीत घुसून शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे. सध्या रोशनी शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे.
“आमच्या विरोधात बोलाल, तर तुम्हाला शूट करू. आमच्या बाजूने आलात, तर तुम्हाला सेट करू. हे गलिच्छ राजकारण सुरू आहे. रोशनी शिंदे या गर्भवती महिलेला मारहाण करण्यात आली, ही निंदनीय घटना आहे. एवढे गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण कधीच झाले नव्हते. यापूर्वी शरद पवार, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरही टीका झाली होती. पण, आमच्या विरोधात बोलाल, तर उद्ध्वस्त करून टाकू, ही पद्धत वाईट आहे,” असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
“गिरीश कोळी या व्यक्तीला समाजमाध्यमांवर लिहितो म्हणून मारहाण करण्यात आली. शिवसेना वगळून अनेक हात लिहिते झाले आहेत. लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. कपट-कारस्थान करून राज्य बळकावण्यात आले. हे लोकांना पटले नाही, म्हणून ते समाजमाध्यमांवर लिहीत असतात,” असे सुषमा अंधारेंनी सांगितले.
“संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी दिली जाते तेव्हा देवेंद्र फडणवीस शांत असतात. तुमच्या घरात २०१६ पासून एक महिला वावरत आहे, याची माहिती तुम्हाला नसते. मग, गृहमंत्री म्हणून तुमची पकड कमी झाली आहे का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकही दंगल झाली नाही. मात्र, संभाजीनगरची दंगल भाजपापुरस्कृत झाली,” असा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे.
हेही वाचा : नाना पटोलेंना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला एक खोका मिळतो? आशीष देशमुखांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले
“देवेंद्र फडणवीसांकडे कामाचा ताण जास्त असेल, तर दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी. तसेच, एकनाथ शिंदे, तुम्ही राज्याचे चालक आणि पालक आहात. एका गटाचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागू नका. त्यात आपलेच अवमूल्यन होत आहे,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.