Sushma Andhare On Anjali Damania : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर नुकतेच पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झाले. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील ५०० कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या एका नातेवाईकाला दिल्याचा आरोप दमानियांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींवर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत अंजली दमानिया आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ‘मंत्री मोहोळांवर जमीनीचे आरोप झाले तेव्हा दमानिया कुठे होत्या?’ असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“अंजली दमानिया यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मध्येच एखादं प्रकरण सोडत जाऊ नका. एखाद्या प्रकरणावर बोलल्यानंतर ते शेवटापर्यंत घेऊन जा. पण मध्येच काय होतं ते कळत नाही आणि अचानक वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि दमानियांचा उद्याचा अंकच निघत नाही, पण असं होऊ नये अशी अपेक्षा आहे”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.
पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीच्या भाजपातील प्रवेशाबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे. धर्म नावाची गोष्ट भाजपासाठी श्रद्धेचा आणि अस्तेचा विषय नाही. धर्म नावाची गोष्ट भाजपासाठी फक्त एक मार्केटिंग फंडा आहे. पालघर हत्याकांड प्रकरणात ज्या चौधरी नावाच्या व्यक्तीवर ठपका ठेवण्यात आला. त्याच्या विरोधात भाजपाने रान पेटवलं होतं. आता त्याच माणसाला भाजपाने पक्ष प्रवेश दिला. अशाच प्रकारे भाजपाने बडगुजर यांनाही पक्ष प्रवेश दिला. असचं भाजपाने भुजबळांना मंत्रिपद दिलं. अशाच पद्धतीने मांडीला मांडी लाऊन नवाब मलिकांच्या शेजारी भाजपावाले बसले”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“टीका झाली नसती तर भाजपाने पालघर साधू हत्या प्रकरणातील आरोपीचा प्रवेश करून घेतलाच असता. कारण देवेंद्र फडणवीस यांची अशी अडचण आहे की ते स्वत: नेते घडवू शकत नाहीत. तसेच पक्षात असणाऱ्या दुसऱ्या नेत्यांचं नेतृत्व ते मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना बाहेरचे लोक आयात करावे लागतात. भाजपा आता त्यांच्याबरोबरील एक एक कुबड्या काढून टाकत आहेत, त्यासाठी दमानिया यांच्यासारखे लोकही त्यांना मदत करतात”, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
“अंजली दमानिया अशा कोणी नाहीत की त्यांच्यावर सर्व राजकारण अवलंबून राहील. दमानिया सरकारला सहाय्यभूत ठरणारी एक यंत्रणा आहेत. अशी यंत्रणा अण्णा हजारे यांच्याही काळात होती, ती यंत्रणा आताही आहे. मुद्दा हा आहे की अजित पवार यांच्या मुलाचा एका जमीन प्रकरणाशी संबंध येतो. तसेच मुरलीधर मोहोळांचाही प्रत्यक्ष संबंध एका जमीन व्यवहारात येतो. मग अजित पवार यांचा राजीनामा तुम्ही मागता? मग मुरलीधर मोहोळांबाबत मौन का? त्यांचाही राजीनामा मागायला पाहिजे ना? कारण दोन्ही ही प्रकरणे जमीनीशी संबंधित आहेत”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर टीका केली.
