पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊतांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं.

त्यानंतर संजय राऊत यांनी आज ( १० नोव्हेंबर ) मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. तसेच, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे संजय राऊत यांनी नरमले असल्यांच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : देशमुख बंधू ‘भारत जोडो यात्रे’त गैरहजर, प्रकाश आंबेडकरांचे भाकीत खरं ठरणार?; काँग्रेस नेते म्हणाले…

“संजय राऊत बुधवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित नव्हते. सध्या संजय राऊत यांनी कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे. तरीही कर्तव्य समजून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पण, मोठ्या लढाईची अथवा संघर्षाची सुरुवात करण्यापूर्वी तयारी केली जाते. ही पत्रकार परिषद फक्त तयारीची सुरुवात आहे,” असे सुषमा अंधारेंनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची संजय राऊत भेट घेणार आहेत. यावर “अमित शाह देशाचे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी देशाचे किंवा राज्याचे प्रतिनिधी असल्यासारखं वर्तवणूक केली पाहिजे. हे सुनावण्यासाठी राऊत त्यांची भेट घेणार आहेत,” असेही सुषमा अंधेरी म्हणाल्या.

हेही वाचा : “…तर तुम्ही पंतप्रधान बनले नसता”, मल्लिकार्जुन खरगेंचा मराठीतून मोदींवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांवर केलेली कारवाई बेकादेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. त्यावर “ईडी, सीबीआय अथवा निवडणूक आयोग यांचा दुट्टपीपणा समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वायत्त संस्थांचा भाजपाकडून गैरवापर होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेससह अनेक पक्षांच्या हातात सत्ता होती. पण, भाजपाकडून सुरु असलेले सुडाचे राजकारण यापूर्वी कधीही झालं नाही,” अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.