शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या विविध मतदारसंघांना भेटी देत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सुषमा अंधारे आज सोलापूर दौऱ्यावर होत्या. दरम्यान, केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. बायकोला साडी घेण्यासाठी २०० रुपये नाहीत, असं म्हणणारे शहाजीबापू पाटील कोट्यवधींचा बंगला कुठल्या पैशांतून बांधत आहेत, असा सवाल अंधारेंनी विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी सुषमा अंधारे भाषणात म्हणाल्या, “शहाजीबापू म्हणाले होते की, आपण खूप निष्कलंक माणूस आहे. त्यामुळे बापूला आठवण करून द्यायला पाहिजे. बायकोला साधी २०० रुपयांची साडीही घेता आली नाही, एवढे कष्ट आपण केले, असं बापू म्हणाले होते. पण आता बापूंनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत.”

शहाजीबापू पाटलांना उद्देशून सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “वसंतदादा पाटील यांच्या नावाने तुम्ही जी सूतगिरणी नोंदली होती. त्या सूतगिरणीचे शेअर्सही गोळा झाले होते. याला सरकारने काही अनुदानही दिलं होतं. त्याची काही जमीनही होती. हे सगळं आता कुठे आहे बापू ? ती जमीनही गायब, अनुदानही गायब, शेअर्सचे पैसेही गायब. एवढं सगळं गायब केलं बापू ढेकर तरी द्यायचा की…”

हेही वाचा- “अजित पवार शिंदे गटात…”, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होतेय म्हणत बंडखोर आमदाराचं विधान

“दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही पतंगराव कदमांच्या नावाने एक क्रेडिट सोसायटीही सुरू केली होती. ती क्रेडिट सोसायटी कुठे गेली? त्याचे शेअर्स कुठे गेले? त्याचा पैसा कुठे गेला? याबाबत बापूला विचारलं पाहिजे. बापू तुम्ही राधाकृष्ण दुधसंघही स्थापन केला होता. त्या दूधसंघाचं काय झालं? हे जुन्या-जाणत्या लोकांना माहीत असेल,” अशी टीका अंधारेंनी केली.

हेही वाचा- “शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”, फडणवीसांच्या ‘ट्रॅप’बद्दल सुषमा अंधारेंचं मोठं विधान!

“शहाजीबापू पाटलांनी वसंतदादा पाटलांच्या नावाने सूतगिरणी, पतंगराव कदमांच्या नावाने क्रेडिट सोसायटी आणि राधाकृष्ण दुधसंघानंतर त्यांनी एक कुक्कुटपालनही सुरू केलं होतं. मला वाटलं आमचा नारायणभाऊच कोंबड्यांचा धंदा करतो की काय… पण बापूही कोंबड्यांचा धंदा करत होता. तरीही बापू म्हणाले बायकोला लुगडं घ्यायला दोनशे रुपये नाहीत. माझ्या भावजयीने कसा संसार केला असेल? खानदानी लेकरू होतं म्हणून लेकरानं संसार केला. मला माझ्या भावजयीचा (शहाजीबापू पाटलांची बायको) प्रचंड अभिमान आहे. पण बापू मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अकरा वेळा आमदार झालेल्या आबासाहेबांना जे जमलं नाही, ते तुम्ही अवघ्या दोन वर्षात करून दाखवलं. तुमच्याकडे असं कोणतं पैशांचं झाड लागलंय? ज्यामुळे तुम्ही दोन एकरात कोट्यवधींचा बंगला बांधला,” असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare on shahajibapu patil bungalow dont have money to buy saree for wife rmm
First published on: 25-12-2022 at 23:01 IST