शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ओळखल्या जातात. तसेच, त्यांनी विरोधकांना खोचक शब्दांत लगावलेले टोलेही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविषयी केलेल्या विधानांमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदाय नाराज झाल्याचं बोललं जात असून त्यांनी त्यासाठी जाहीर माफीही मागितली आहे. मात्र, तरीही काही वारकरी संघटनांकडून सुषमा अंधारेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर टीव्ही ९ शी बोलताना सुषमा अंधारेंनी भाजपावर आगपाखड केली आहे. तसेच, अधिक आक्रमक होण्याचा जाहीर इशाराही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका वाद काय?

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलेल्या काही विधानांमुळे वारकरी संप्रदाय आक्रमक झाला होता. या वक्तव्यांचा निषेध म्हणून आळंदीत प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली. यानंतर सुषमा अंधारेंनी आपण माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं. “भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही”, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, यानंतरही त्यांना होणारा विरोध कायम असून त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये मोर्चाही काढण्यात आला. देहू पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडलं आहे.

“धारकऱ्यांची नाही, वारकऱ्यांची माफी मागितली”

“पहिली गोष्ट म्हणजे मी माफी धारकऱ्यांची मागितलेली नाही. जे सच्चे वारकरी आहेत, जे कदाचित चुकून का होईना माझ्यामुळे दुखावले असतील, तर त्यांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही”, असं त्या म्हणाल्या.

“माझ्या पक्षानं जर मला सांगितलं…”

“माझ्या पक्षाने जर मला सांगितलं की सुषमाताई, तुमच्यामुळे थोडा त्रास होतोय, तर तेवढं म्हणण्याचीही वेळ मी येऊ देणार नाही. कारण माझा पक्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. माझ्या परक्षासाठी किंवा उद्धव ठाकरेंसाठी काम करायचं असेल, तर ते मी कुठेही राहून करू शकते”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.

प्रेतयात्रा काढल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वारकऱ्यांनी राजकारणात…”

“उलट मी फ्रीलान्स काम करणं हे विरोधकांसाठी जास्त धोकादायक असू शकेल. आत्तातरी मी पक्षाच्या पदावर आहे. मी जर खरंच फ्रीलान्स उतरले मैदानात तर या सगळ्या भाजपावाल्यांची पळता भुई थोडी करेन. पण तरीही, मी काय करावं किंवा मी पक्षात असावं की नाही याची भूमिका माझा पक्ष ठरवणार आहे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या

स्वयंघोषित किर्तनकार…

“जे माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, ते सगळे स्वयंघोषित किर्तनकार भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मागणार आहेत का? ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्या सगळ्यांचा राजीनामा मागणार आहेत का? मंगलप्रभात लोढावर बोलण्याची यांची हिंमत आहे का? यांची प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील किंवा भगतसिंह कोश्यारींवर बोलण्याची हिंमत आहे का? ते यांच्यावर अश्लाघ्य भाषेत बोलू शकतात का?” असे परखड सवालही सुषमा अंधारेंनी उपस्थित केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare shivsena slams bjp targeting on warkari comments pmw
First published on: 16-12-2022 at 12:29 IST