लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगली, मिरजेत जप्त करण्यात आलेली नशेसाठीच्या इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुख्य संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने ६ लाखांची नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन जप्त करत या नशेच्या व्यवहारातील साठा करणाऱ्यासह वितरण साखळी उघडकीस आणली.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले, या नशेच्या व्यापारात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सांगली, मिरजेसह कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात याचा विस्तार झाला असल्याचे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून समजले. सांगलीतील अशपाक पटवेगार याने आपल्या घरात मेफेनटर्माइन या नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या इंजेक्शन बाटल्यांचा साठा केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून सहा लाखाचे इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पोलीस पथकाने जाऊन इंतजार अलि जहीरूद्दीन (वय २५, रा. खलीलपूर, ता. कांठ) याला अटक केली.

या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून यामध्ये सांगली, मिरज, सांगलीवाडीसह निमगाव, विझोरी, दसूर (ता. माळशिरस), बिजवडी (ता. माण), आरूळ (ता. शाहूवाडी) येथील संशयित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विटा येथे एमडी ड्रग्ज उत्पादन केले जाणाऱ्या कारखान्याची मालकीन गोकुळा पाटील यांना अटक करण्यात आली असून त्यांना पुढील तपासासाठी न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्रीमती पाटील यांनी कार्वे औद्योगिक वसाहतीमधील कारखाना नोंदणीकृत करारपत्र न करता संशयिताना केवळ ५०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर भाड्याने दिला होता. या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी ३० कोटींचे अमली पदार्थ जप्त करत ६ जणांना अटक केली होती.