गेल्या २६ फेब्रुवारीनंतर सोलापूर जिल्ह्य़ात गारपीट व वादळी वा-यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे कोटय़वधींची हानी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर या नैसर्गिक आपत्तीसाठी सक्रिय झालेल्या प्रशासनाच्या नियंत्रण कक्षात टेलिफोनद्वारे माहिती देण्या-घेण्याची जबाबदारी असलेल्या चार कर्मचा-यांसह एका कोतवालाला कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मध्यरात्रीनंतर तालुक्याच्या ठिकाणच्या नियंत्रण कक्षांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रशासनातील गलथानपणा आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्य़ात आपत्ती निवारणासाठी सक्रिय केलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय नियंत्रण कक्षात कर्मचारी तैनात आहेत. परंतु हे नियंत्रण कक्ष कितपत कार्यक्षम आहेत, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी मध्यरात्री बारा ते दोनच्या दरम्यान सर्वच तहसील कार्यालयातील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ व बार्शी याठिकाणी तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षांमध्ये गलथानपणा आढळून आला. संबंधित कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्यामुळे जिल्हाधिका-यांनी कठोर भूमिका घेत पाच कर्मचा-यांना निलंबित केले तर अन्य दोघांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित तहसीलदारांनी ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातील करमणूक कर निरीक्षक डी. डी. चव्हाण यांच्यासह पंढरपूरचे समीर कुलकर्णी, दक्षिण सोलापूरचे आर. एस. चव्हाण, अक्कलकोटचे के. बी. शिराळ तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशनचे कोतवाल व्ही. आर. ढाले यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले, तर मोहोळ तहसीलमधील लिपीक शेंडगे व बार्शी तहसीलमधील शिपाई एच. टी. शिंदे यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली आहे.