सांगली : वीजग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसविण्यास आमचा विरोध असून हे मीटर मोफत बसविण्यात येणार असल्याचे सांगून याची वसुली ग्राहकांकडून केली जाणार असल्याने स्वतंत्र भारत पक्षाने सोमवारी निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी सध्याचे पोस्ट पेड मीटर ठेवून वीज जोडणी कायम राहावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, वीज कायद्यानुसार कोणते मीटर बसवायचे हे निश्चित करण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. मात्र, कंपनीकडून अघोषित सक्ती करून स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या निविदेनुसार मीटरचा खर्च १२ हजार प्रति मीटर आहे. केंद्र सरकार प्रति मिटर ९०० रुपये अनुदान देत असून प्रति ग्राहक ११ हजार १०० रुपये कंपनीकडून वसूल केले जाणार आहेत. भविष्यात हा खर्च वसुलीसाठी ग्राहकावर प्रति युनिट ३० पैसे वीज दरवाढ होणार आहे. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये प्रीपेड मीटर बसविण्यात आली आहेत. यामुळे बऱ्याचवेळा दुप्पट आकारणी, पैसे भरूनही वीज पुरवठा सुरू न होणे अशा तक्रारी आहेत. यामुळे आमचा या स्मार्ट मीटरला विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा : VIDEO:जेव्हा फेरारीच्या मदतीला बैलगाडी येते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विरोधात आज डिग्रजमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. या आंदोलनात फराटे यांच्यासह श्रीपाल बिरनाळे, रावसाहेब पाटील, महादेव भोसले, प्रकाश साळुंखे, राम कुडलगोपाळ, तात्या परीट, राजू हौंजे, धनपाल पाटील आदी सहभागी झाले होते.