सांगली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ताकदीने लढविणार असून कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांनी बुधवारी केले.तासगाव बाजार समितीच्या सभागृहात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तांबोळी बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष विश्वासराव पाटील, युवक अध्यक्ष सचिन पाटील आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी तांबोळी म्हणाले, युवा आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एक हाती आपल्याला जिंकायच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच तयारीला लागा. पक्षामध्ये काम करत असताना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा अभ्यास केला पाहिजे. समाजकारण आणि राजकारण करत असताना संयमाने वाटचाल केली पाहिजे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच आपण सर्वांनी तयारीला लागूया. आमदार पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी तरुणांची फळी मजबूत असली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी झोकून देऊन पक्षासाठी अविरत काम करण्याची आवश्यकता आहे. 

यावेळी तालुका अध्यक्ष पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जर का आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करायची संधी मिळेल. तरुणांनी त्या दृष्टिकोनातून कार्यरत राहिले पाहिजे. युवकचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव, तालुका कार्याध्यक्ष अरविंद पाटील, चिंटू पाटील, दीपक पाटील, हर्षवर्धन पाटील, विक्रम पाटील आदी पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीनंतर तहसीलदारांना शेतकरी कर्जमाफीबाबत निवेदन देण्यात आले. महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तासगाव मध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची राजकीय ताकद असून त्यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून लढवली होती. त्यांच्या गटांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला लढत द्यावी लागेल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात चुरस होणार आहे.