तलाठी भरती परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला. असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती आहे. या प्रकाराने परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाऊन; परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ आणि…

“माझ्यासकट अनेकांनी सर्वांनी ट्वीट करत सावधानता बाळगा, पेपरमध्ये काही गडबड होऊ शकते असं सांगितलं होतं. पण हे सरकार कोणत्याही परिस्थितीत गंभीर नसल्याने सत्तेचा राजकारण इतकं भिनलेलं आहे की सत्ता, सत्ता आणि सत्ता बाकी लोकं गेली खड्ड्यात”, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार १७ ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या पाळीतील परीक्षा होती. याचवेळी पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ९ वाजता नंतरही विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते.

पहिल्याच दिवशी फुटला होता पेपर

दरम्यान, १७ ऑगस्टपासून तलाठी परीक्षा सुरू झाली. परंतु, पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व प्रकारांमुळे तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या होतकरू उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.