Container House मध्ये होणार तळीये ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! CSR निधीतून मागवली घरं!

तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

container house in taliye
तळीयेवासीयांची कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती व्यवस्था!

मागील महिन्यात कोकणातील तळीये गावात दरड कोसळल्यामुळे आख्खं गावच मलब्याखाली आलं. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर तळीयेवासीयांचं म्हाडातर्फे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून देखील दीड लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही घरं उपलब्ध होईपर्यंत तळीये ग्रामस्थांची निवाऱ्याची सोय व्हावी, म्हणून कंटेनर हाऊसचा पर्याय निवडण्यात आला आहे. यासाठी तळीयेमध्ये २६ कंटेनर हाऊस दाखल देखील झाले आहेत. या घरांमध्ये आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असून त्यात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा देखील उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

२१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाड तालुक्यातील तळीये, पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे दरडी कोसळून घरांचे नुकसान झाले. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) कंटेनर हाऊस मागविण्यात आले आहेत.

लवकरच वीज-पाणी पुरवठ्याची सोय होणार!

तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी शेड उभारण्याकरता बराच वेळ लागतो. त्यामुळे कंटेरन हाऊसचा पर्याय निवडण्यात आला आहे. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, रहेजा, जिंदाल, नरेलो आदी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे कंटेनर हाऊस मागविण्यात आले आहेत. हे  सर्व कंटेनर हाऊस आधुनिक सुविधांनी युक्त आहेत. या घरांमध्ये पाणीपुरवठा व वीज पुरवठा देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

घरांमध्ये राहण्याची कुणावरही सक्ती नाही

अशाच प्रकारे पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथील लोकांसाठी देखील तात्पूरत्या पुनर्वसनासाठी कंटेनर हाऊस देण्यात येणार आहेत. “तात्पुरत्या पुनर्वसनासाठी तळीयेमध्ये २६ कंटेनर हाऊस आणण्यात आले आहेत. या घरांमध्ये रहायला जाण्यासाठी कुणावरही सक्ती केली जाणार नाही. जागा ताब्यात मिळाल्यानंतर या गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल”, असं देखील निधी चौधरी यांनी सांगितलं.

तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसनाला गती

कंटेनर हाऊस म्हणजे काय?

जलमार्गे मालवाहतूक करण्यासाठी मोठमोठ्या कंटेनर्सचा वापर केला जातो. कधीकधी हे कंटेनर्स आपल्या दोन ते तीन खोल्यांइतके देखील मोठे असतात. अशाच कंटेनर्सचं छोटेखानी तात्पुरत्या घरामध्ये केलेलं रुपांतर म्हणजेच कंटेनर हाऊस. या घरांमध्ये रोजच्या लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्था केलेली असते. त्यात स्वयंपाकाची जागा, शौचालय अशा सुविधा देखील उपलब्ध करून दिलेल्या असतात.

तळीये गावातील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने घेतली आहे. तर राजयड जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा एकत्रितपणे ही जबाबदारी उचलत आहे. तळीयेतील कोंढारकरवाडीतील ६० घरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यानुसार यासाठी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली सरकारी जमीन निश्चिात करण्यात आली होती, पण ही जागा दूर असल्याने याला गावकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर गावातीलच १२ एकर खासगी जागा निश्चिात करण्यात आली आहे. ही जागा नियमानुसार संपादित करावी लागणार असल्याने लवकरच यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taliye village mahad taliye landslide container house in csr fund pmw

ताज्या बातम्या