प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर अनेकांनी आक्षेप घेत बंदी आणण्याची मागणी केली आहे. ती अश्लील नृत्य करते असा आरोप अनेकांनी केला. यानंतर आता तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी गौतमी पाटीलवर टीकास्र सोडलं आहे. पावसाळ्यात गावागावांत जशी छत्री उगवते, तशी गौतमी पाटील आहे, अशी टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केली.

गावोगावी सुरू असलेल्या जत्रा आणि गौतमी पाटीलची वाढती क्रेझ यामुळे तमाशा कलाकारांना फटका बसतो का? असं विचारलं असता तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील म्हणाले, “गौतमी पाटील म्हणजे गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते, तशी गौतमी पाटील आहे. अशा गौतमी खूप आल्या. पण तमाशा ही लोकनाट्य कला चिरतरुण आहे आणि यात कधीही खंडण पडणार नाही. गौतमी पाटील ही गावात छत्री उगवते, त्या पद्धतीची आहे.”

हेही वाचा- आधी तरुणांनी धुडगूस घातला मग गावातल्या महिलांनी काठ्या घेऊन…; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ

तमाशा परिषदेचे अध्यक्ष पुढे म्हणाले, “ज्या उदरातून जन्म घेतला तिकडे गौतमी पाटीलने हात केला म्हणजे ती खूप मोठी झाली का? तिच्याकडे कुठली कला आहे? आमच्या तमाशातील बाईबरोबर ती नाचू शकते का? आमच्या तमाशातील बाई नऊवारी नेसलेली असते. गावगाड्यातील शेतकऱ्याला जगवायचं काम आमच्या कलाकारांनी केलं. कुत्र्याने लघुशंका केल्यानंतर जशी छत्री उगवते, त्या छत्रीसारखी गौतमीची अवस्था आहे.”

हेही वाचा- कपडे बदलतानाचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझी मनस्थिती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गौतमी पाटील अजून महिनाभर चालेल. त्यानंतर ती कुठे जाईल, हे माहीत नाही. दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांची करमणूक कुणी केली? असेल तर ती आमच्या शायर आणि तमाशा कलाकारांनी केली. गौतमी पाटीलने नाही केली. त्यामुळे तिची तुलना आमच्याबरोबर करू नये,” अशी टीका संभाजीराजे पाटील यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.