हिंगोली : आगामी पंतप्रधान महाराष्ट्रीयन-मराठी नेता व्हावा, यासाठी तामिळ भाषिक असलेले ॲड. शिवा अय्यर हे राज्यभर भ्रमंती करत आहेत. शुक्रवारी ते हिंगोलीत दाखल झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व बसस्थानकावर काही वेळ वरील मागणीच्या संदर्भाने तयार केलेला फलक घेऊन उभे असलेले ॲड. अय्यर हे दिवसभर सर्वांचे आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरले.या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आहेत.
आपल्या विचाराच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे ते आवाहन करत होते. ॲड. अय्यर आपली माहिती सांगताना आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ते म्हणाले, आपण मूळ तामिळ भाषिक असून, डोंबिवलीत अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहोत.
मुंबईत उच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. भारताचा आगामी पंतप्रधान महाराष्ट्रीयन मराठी माणूसच व्हायला पाहिजे. कारण उत्तर प्रदेशाला ११ वेळा, गुजरातला ४ वेळा, आंध्र प्रदेशाला १ वेळ, कर्नाटकाला १ वेळा पंतप्रधानपदाची संधी मिळाली. महाराष्ट्राला एकदाही संधी मिळाली नाही. भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती क्रमपद्धतीने करावी. ही आपली प्रमुख मागणी असल्याचे ते म्हणाले.