हिंगोली : जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना प्रशासनाला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आतापर्यंत समोर येत होते. परंतु औंढा नागनाथच्या तहसीलदारांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन मालमोटर ताब्यात घेतल्या. चर्चा सुरू असतानाच वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई सुरू केली आहे. तहसीलदार दळवी यांनी वाळूची अवैध तस्करी करणारी एक मालमोटर ताब्यात घेतली व त्यांच्या कार्यालय परिसरात लावली.
जिल्ह्यात पूर्णा नदी पात्राचा अधिक भाग वसमत तालुक्यात येतो. परिणामी वाळू अवैधरीत्या उपसा होत असल्याची प्रकरणे त्या परिसरात अधिक घडतात. औंढा नागनाथ तालुक्यातील अनखळी-साळना मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी पूर्णानदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करीत असताना तहसीलदार हरीश गाडे यांनी दोन्ही मालमोटर जप्त केल्या आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई केली.
या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून शहरात रात्री-अपरात्री अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना मिळाली होती. अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी खुद्द तहसीलदार शारदा दळवी यांनी सहकाऱ्यांसह शनिवारी आसेगाव मार्गावर अवैध वाळूची वाहतूक करणारी एक मालमोटर पकडून ताब्यात घेतली. चालकाची तहसीलदार दळवी यांनी चौकशी केली असता त्याने उडवा-उडीची उत्तरे दिली, तेव्हा त्यांनी वाहन ताब्यात घेऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात लावले.