राज्याच्या अनेक भागांतील तापमानाचा पारा खालावला असून अनेक भागांमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. यापैकी नाशिक आणि नगरमध्ये शनिवारी यंदाच्या हंगामातील निचांकी पाऱ्याची नोंद झाली. अहमदनगरमध्ये शुक्रवारी ८.२ अंश सेल्सिअस तर शनिवारी सकाळी ७.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. तर गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने निचांकी तापमानाचा विक्रम करणाऱ्या निफाडमध्येही ८.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. उत्तरेतील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र सर्वात जास्त गार पडला आहे. राज्याच्या अन्य भागात पारा खालावत असला तरी मुंबईत अजूनही थंडीने तितकासा जोर धरलेला नाही. दरम्यान, यंदा नाशिकमध्ये महिनाभर अगोदरच थंडीचा कडाका वाढल्याने शेतकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. रब्बीच्या पिकांसाठी थंडी पोषक असली तरी त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंता वाढल्या आहेत.
उत्तरेकडील थंडगार वाऱ्यांमुळे राज्यात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली थंडीची लाट शुक्रवारी अधिक तीव्र झाली. अहमदनगर येथे राज्यातील सर्वात कमी तापमान, ७.१ अंश से. नोंदले गेले. थंडीची ही लाट पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लांबलेल्या पावसाळा आणि लवकर आलेली थंडी यात ऑक्टोबर हीट गुडूप झाली असून आता थंडीने संपूर्ण राज्य कुडकुडत आहे. देशाच्या उत्तरेत आलेली थंडी आता दक्षिणेकडे झिरपत आहे. सलग तीन दिवस तापमापकातील पारा अधिकाधिक खाली जात असून शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथील काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. त्यामानाने मुंबईसह कोकण परिसरातील तापमान सरासरीपेक्षा फारसे कमी झाले नसले तरी पहाटे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना थंडी चांगलीच जाणवत आहे. उत्तरेतील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर-मध्य महाराष्ट्र सर्वात जास्त गार पडला आहे. राज्याच्या अन्य भागात पारा खालावत असला तरी मुंबईत अजूनही थंडीने तितकासा जोर धरलेला नाही.
अहमदनगर येथे शुक्रवारी ७.१ अंश से. पर्यंत तापमान घसरले. पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, गोंदिया या भागातही थंडीने कापरे भरण्याची वेळ आली. नाशिक येथे ८.८ अंश से., पुणे येथे ९.४ अंश से. जळगाव येथे १० अंश से., नागपूर येथे १०.८ अंश से. तर गोंदिया येथे ११.३ अंश से. तापमान नोंदले गेले. त्यामानाने दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकण काहीसा उबदार राहिला.
रत्नागिरी येथे १७.६ तर अलिबाग येथे १८.५ अंश से. तापमान होते. मुंबईमध्येही सांताक्रूझ येथे किमान तापमान १६.४ अंश से. तर कुलाबा येथे २१.८ अंश से. तापमान राहिले. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा पाच अंश से. ने कमी होते. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस तरी राहणार असून १५ नोव्हेंबर म्हणजे सोमवारपासून उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट सुरू होणार आहे. त्यावेळी वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहिल्यास राज्यातही थंडी राहील.