सांगली : कर्नाटकात जात असलेल्या मालवाहतूक टेम्पोला अडवून हत्याराचा धाक दाखवत सात लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास मिरज तालुक्यातील बेडग-मंगसुळी रस्त्यावर घडली. चार ते पाच जणांच्या टोळीने दोन मोटारींतून पाठलाग करून ही लूट केल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी, पुण्यातील लक्ष्मण कदम व विजय सोनटक्के हे कर्नाटकातील विजयपूर येथे मालवाहू टेम्पोमधून (एमएच १२ व्हीटी ७८४८) किराणा साहित्य खरेदीसाठी निघाले होते. मिरजेपासून १५ किलोमीटर अंतरावर बेडग-मंगसुळी रस्त्यावरील पाटील मळा येथे आल्यानंतर चालकाला आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आले. बचावासाठी प्रयत्न करत असतानाच मागून आलेली मोटार पुढे लावून अडविण्यात आले. आणि टेम्पोच्या काचेवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. हल्ला होण्याच्या भीतीने टेम्पोतील दोघांनी पलायन केले. या दरम्यान, दोन मोटांरीतून आलेल्या हल्लेखोरांनी टेम्पोतील माल खरेदीसाठी घेतलेली सात लाखांची रोकड घेऊन पोबारा केला.
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक गुुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असून, मिरजेपासून घटनास्थळापर्यंत चलतचित्रातून हल्लेखोरांच्या मोटारीबाबत माहिती घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. याप्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.