नैराश्य, कर्जबाजारीपणाला कष्टातून उत्तर
रविंद्र केसकर, उस्मानाबाद</strong>
कर्जबाजारीपणा आणि त्यातून वाढत जाणाऱ्या शेतकरी आत्महत्या हे दुष्टचक्र सुरू असताना त्यातून बाहेर पडण्याचा सक्षम मार्ग दाखवला आहे लोहारा तालुक्यातील आरणी गावच्या ‘सावित्रीच्या लेकीं’नी! ‘जय भीम महिला बचत गटा’च्या माध्यमातून दहा महिलांनी ‘करार शेती’ नावाचा केलेला प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. त्यातून कर्जबाजारीपणातून कसे सुटायचे, या प्रश्नाला ‘कष्ट’ हेच उत्तर मिळाले. घरातील कर्त्यां हाताला आर्थिक बळ देण्याचे काम या महिलांनी केले असून कर्जामुळे येणाऱ्या नराश्यावर ही ‘करार शेती’ म्हणजे ‘भीमबाण’ असल्याची प्रतिक्रिया बचत गटातील महिला व्यक्त करतात.
लोहाराजवळचे आरणी हे छोटेखानी गाव. तेथे जयभीम महिला बचत गट २०१४ पासून कार्यरत. गावातील शोभा संगशेट्टी या महिलेला मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची गरज होती. त्यांनी लग्नासाठी हव्या असलेल्या रकमेकरिता बचत गटाकडे मागणी केली. बचत गटाकडे वर्षांकाठी १२ ते १५ हजार रुपयांची रोकड जमा होत असे. चार वर्षांत जमा झालेले ५० हजार रुपये बचत गटाच्या खात्यावर होते. एक लाख रुपयांची तरतूद करण्यासाठी महिलांनी बँकेकडे धाव घेतली. बँकेनेही ५० हजार रुपयांचे कर्ज देऊ केले. त्यातून नवा पर्याय जन्माला आला. शोभा संगशेट्टी यांच्या मुलीच्या लग्नाकरिता एक लाख रुपये देऊन त्यांची अडीच एकर जमीन बचत गटाने पाच वर्षांसाठी करार करून घेतली. शोभा संगशेट्टी यांना बिनव्याजी एक लाख रुपये मिळाले आणि जय भीम बचत गटातील महिलांना पाच वर्षांसाठी अडीच एकर जमीन मिळाली. एकमेकांच्या गरजांतून जन्माला आलेला हा ‘करार शेती’चा पर्याय आता अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे.
वर्षभर इतरांच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या बचत गटातील सागरबाई वाळवे, आशा मोटे, भारतबाई मस्के, शांताबाई कांबळे, लक्ष्मी हिरवे, गजराबाई पांचाळ, राहीबाई मस्के, केसरबाई मस्के, ललिता मस्के आणि शकुंतला मस्के या १० जणींनी एकमेकींच्या हातात हात गुंफत ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले आहे. पहिल्याच वर्षी त्यांनी खरिपात सोयाबीन आणि मुगाची लागवड केली. खर्च वजा जाता ५० हजार रुपयांचा घसघशीत फायदा पदरात पडला. विश्वास दुणावला, आणखी हिरिरीने कष्ट करण्याला सुरुवात झाली.
रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारीची लागवड केली आणि शेती परवडत नाही, अशी वल्गना करणाऱ्या अनेकांच्या समोर केवळ अडीच एकर जमिनीतून पुन्हा ४५ हजार रुपयांचे खर्च वजा जाता ठोक उत्पन्न कमविले. एकाच हंगामात सुमारे लाखाच्या घरात फायदा समूह शेतीने या दहा जणींना मिळवून दिला. आणखी चार वर्ष बचत गटाला शेतीतून उत्पन्न मिळणार आहे. कर्जबाजारीपणामुळे कुटुंबाची होत असलेली परवड असे चित्र समोर असताना ‘जय भीम महिला बचत गटा’च्या रणरागिणींनी नवा पर्याय जन्माला घालून राज्यासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. त्यांच्या या सामूहिक शेतीची दखल जिल्हा प्रशासन देखील आता आवर्जून घेत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात हा प्रयोग जावा, अशी अपेक्षा बचत गटातील महिला व्यक्त करतात.
सेंद्रिय शेतीमुळे अधिक उत्पन्न
गटाची सदस्या शोभा संगशेट्टी यांना मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये कर्ज दिले. त्या बदल्यात बचत गटाने पाच एकर शेती करार पद्धतीने घेऊन कमी खर्चात शेती केली. सुरुवातीच्या दोन वर्षांत आम्ही १० महिलांनी शेतीत सोयाबीन, हरभरा, ज्वारीचे उत्पन्न घेतले. दहा महिलांच्या कष्टामुळे रोजगार खर्च वाचला. कोणत्याही रासायनिक खताचा किंवा बाहेरून बियाणे, कीटकनाशके विकत न घेता ती बचत गटाने निर्माण केली. सेंद्रिय शेतीमुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळाल्याने शोभा संगशेट्टी यांचे एक लाख रुपये पहिल्या दोन वर्षांत मिळाले. सध्या पाच चिंचेची झाडे विकत घेतली आहेत. चिंच, चिंचोके विक्रीतून बचत गटाला तिप्पट उत्पन्न मिळणार आहे.
– शोभाताई मस्के, सदस्य, जय भीम बचत गट, आरणी