बीड – धारूर तालुक्यातील एका गावात  रविवारी दोन गटात वाद झाले. सोमवारी होणाऱ्या एका मेळाव्यावरून फलक लावणे व काढण्यावरून झालेल्या वादातून दोन्ही गट आमने-सामने आले. यावरून गावात तणावाची परिस्थिती असून, पोलीस दाखल झाल्यानंतर काहीसा तणाव निवळला असला तरी हे प्रकरण ठाण्यात पोहोचल्यानंतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गावात रविवारी एका गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याच्या संदर्भाने गाववेशीवरील प्रवेशव्दार असलेल्या कमानीवर काही फलक लावण्यात आले होते.

या फलकावर देवतांसह संत–महापुरुषांसह नेत्यांचेही छायाचित्र होते. मात्र हा फलक पाच ते सहा युवकांनी फाडल्याचा आरोप होत असून, त्यांचे कृत्य काहींनी पाहिल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच, प्रवेशव्दारावर दुसऱ्या गटाकडून त्यांच्या नेत्याच्या स्वागताचा फलक लावताना दोन्ही गट आमने-सामने आले. या फलकावर “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए”सारखी वाक्य लिहिण्यात आले होते. अशी वाक्यं विरोधी गटाला डिवचणारी आणि बोचणारी असल्याचा आरोप करण्यात आला व यातूनच उद्भवलेला वादाची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले व दुसऱ्या गटाकडून लावण्यात आलेला फलक काढल्याने तणावाचे वातावरण निवळले.

या प्रकरणी गावच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार नोंदवली असून, त्यावरून दोन गटात वाद निर्माण केल्याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला .