अमरावती :  अचलपूर शहरात झेंडा काढण्याचा वाद विकोपाला गेला. त्यातच दगडफेक झाल्याने रविवारी रात्री उशिरा दंगलसदृश स्थिती निर्माण झाली.  परिणामी, अचलपूर, परतवाडा, देवमाळी आणि कांडली परिसरांत पोलिसांना संचारबंदी लागू करावी लागली.  सध्या या जुळय़ा शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

अचलपूर हे शहर अतिसंवेदनशील मानले जाते. रविवारी झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली, त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे . जमावाने वाहनांची तोडफोड केली.  अचलपुरातील प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट भागात विविध धर्मीय आपापल्या सणांनुसार झेंडे फडकवत असतात. रविवारी रात्री उशिरा काही समाजकंटकांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच दगडफेकीत झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यानंतर मात्र जमावाची पांगापांग झाली. या प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून आतापर्यंत २३ जणांना  अटक करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांना रोखले

सोमवारी सकाळी तणावग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांना पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती देताना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणाले की,  सध्या शहरात संचारबंदी आहे. कुठल्याही कारणासाठी कोणीही शहरात प्रवेश करू शकत नाही.

भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी म्हणाल्या,  पोलिसांनी अनेक निर्दोष तरूणांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले आहे. या कसोटीच्या काळात हिंदूंना दिलासा देण्यासाठी आम्ही इथे पोहोचलो. मात्र, पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवले.

या घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करा, पण निरपराध नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणि निर्दोष नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. –नवनीत  राणा, खासदार, अमरावती.