महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रश्नपत्रिका क्रमांक एक फुटल्याचे सिद्ध झाले असून, या प्रश्नपत्रिकेची फेरपरीक्षा लवकरच नव्याने घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पेपर फुटीच्या विषयातील गांभीर्य लक्षात घेऊन सदर घटनेत नोंद केलेल्या चारही गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन १६ जानेवारी २०१६ रोजी राज्यातील ६२३ केंद्रावर करण्यात आले होते. या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.०० पहिले सत्र व दुपारी २.०० ते ४.३० दुसरे सत्र अशा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी सकाळच्या सत्रातील पहिल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेच्या अनुषंगाने पेपर फुटीबाबत सखोल चौकशी करून त्याचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याबाबतचे निर्देश विनोद तावडे यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना दिले होते. याबाबत त्यांनी चौकशी करून सादर केलेल्या अहवालानुसार पेपर छपाई, वितरण व्यवस्था या बाबीमध्ये काही त्रुटी संभवतात. बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी तसेच धुळे व पुणे शहर येथे पेपर फुटीच्या घटना घडलेल्या असल्याचे आढळून आले. याबाबत चारही घटनेमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याबाबतचा पोलीस तपास सुरु आहे. परंतु, या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सीआयडीचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.