“सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे.” अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील यांनी केली.

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता – देवेंद्र फडणवीस

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत होते. पण आता एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलीसच उद्योगपतीला धमकी देण्यासाठी स्फोटके ठेवत असतील, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने या स्थितीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ पोलीस अधिकाऱ्यावर बदलीची कारवाई करणे म्हणजे लोकांचा राग शांत करण्यासाठी केलेली किरकोळ उपाययोजना आहे. सरकारने या प्रकरणात मुळापर्यंत जायला हवे.”

अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली; हेमंत नगराळे नवे पोलीस आयुक्त!

सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

पोलीस दलातील बदली प्रकरणाची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी  –

महाराष्ट्र पोलीस दलातील बदली प्रकरणाची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी, अशी चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली आहे. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले  आहे. पोलीस दलात इतकी अनागोंदी आहे पण गृहमंत्री काहीच बोलत नाहीत,  खासदार संजय राऊत हेच सतत गृह विभागावर बोलत असतात त्यांनाच गृहमंत्री  करावं, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray government should take resign from home minister chandrakant patil msr
First published on: 17-03-2021 at 18:25 IST