केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. १७ फेब्रुवारी) शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर दोन्ही गटांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आनंदोत्सव साजरा करत आहे, तर ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. बुलढाणा येथे तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना निवेदन देत आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह शोधून द्या, नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हे वाचा >> शिवसेना भवनाबाबत आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्यासाठी ती प्रॉपर्टी…”
काय म्हटले आहे तक्रारीत?
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे चोरीला गेल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. आमचं चोरीला गेलेले चिन्ह आणि नाव पोलिसांनी तपास करून परत आणून द्यावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी दिला आहे.
“हिंदूहृदयसम्राट शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. मिंधे गटाने निवडणूक आयोगाला हाताशी धरुन शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्याबाण हे चिन्ह चोरून घेतले आहे. त्याबाबत रितसर तक्रार आम्ही पोलीस स्थानकात येऊन दिली आहे. आमचे चिन्ह आणि पक्षाचे नाव पुन्हा मिळाले नाही, तर येत्या काळाता शिवसेना स्टाईलने आंदोलन करु, असे निवेदन पोलिसांना दिले असल्याचे लखन गाडेकर यांनी सांगितले.
हे वाचा >> Maharashtra News Live: भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही – उद्धव ठाकरे
बुलढाणा जिल्ह्यात ठाकरे गटाकडून निदर्शने
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून निषेध नोंदविला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या निषधार्थ घोषणाबाजी करित निदर्शने केली.
निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांना ताब्यात घेऊन लोकाशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मराठी अस्मिता निर्माण केली. त्या शिवसेनेला तिलांजली देण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे. शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यामुळे आम्ही त्याविरोधात आंदोलन करत आहोत. लोकशाही अबाधित ठेवयाची असेल तर आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाला धडा शिकवला पाहीजे, असे आवाहन बुलढाणा उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी केले.