सांगली : सांगलीतील श्री गणपती पंचायतनच्या चोर गणपतीचे रविवारी पहाटे गाजावाजा न करता चोरपावलांनी आगमन झाले. यानंतर शहरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून आज बाजारपेठेतही गणेश पूजा, आरास यांचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ‘चोर’ गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या गणपती पंचायतन संस्थानचे हे गणपती प्रसिद्ध आहेत. सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या चोर गणपतीला १५० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची चतुर्थीच्या चार दिवस अगोदर म्हणजे भाद्रपद शुध्द प्रतिपदेला प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भक्त, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.
साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. तर उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना दरबार हॉलमध्ये करण्यात येते. उत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्सवी मूर्तीचे कृष्णा नदीत विधिपूर्वक विसर्जन करण्यात येते. मात्र, चोर गणपती म्हणून प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मूर्तीचे विसर्जन न करता सुरक्षित स्थळी ठेवण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती पंचायतनचे मंदिर सुशोभित करण्यात आले असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून गणेशपूजेचे साहित्य आणि आरास साहित्याची खरेदी करण्यासाठी बाळगोपाळांसह थोरांचीही सांगलीत आज गर्दी उसळली होती. सजावटीसाठी लागणाऱ्या कमानी, प्लास्टिकची फुले, हार, विद्युत माळा यांच्या खरेदीसाठी सांगलीतील हरभट रोड, गणपती पेठ, मारूती रोड, विश्रामबागमधील गणेश मंदिर, मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात आज गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती.
काही घरगुती गणपतीचे आगमन हरितालिकेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी होणार असून यासाठी श्रींच्या मूर्तीची विक्री करण्यासाठी जिल्हा बँकेसमोर स्टॉल लावण्यात आले आहेत. आगळी वेगळी मूर्ती मिळावी यासाठी अनामत देऊन मूर्तीची निश्चिती करण्यासाठी आज रविवारचा सुटीचा दिवस गणेशभक्तांनी निवडला. यामुळे या परिसरातही मोठी गर्दी पाहण्यास मिळाली.