सातारा : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई येथे आठवीच्या वर्गासाठी मंत्रिमंडळ निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेद्वारे उत्साहात पार पडली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
निवडणुकीचे आयोजन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनाच मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मतदारांची ओळख पटवणे, बोटाला शाई लावणे आणि मतदान गोपनीयतेने पार पाडणे अशा सर्व टप्प्यांची अंमलबजावणी विद्यार्थ्यांनी केली.
ईव्हीएमचा प्रतीकात्मक अनुभव विद्यार्थ्यांना देण्यासाठी मोबाइलवर आधारित वोटिंग ॲप वापरण्यात आले. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांसारख्या संज्ञांची ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना झाली. मुख्याध्यापक रवींद्र कांबळे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मतदान ही लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. उपमुख्याध्यापक गणेश ससाणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
पर्यवेक्षक धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख करून दिली. या वेळी ज्येष्ठ शिक्षक प्रताप यादव, राजेश भोज, स्वप्नाली जाधव व योगिता गावित यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन वर्गशिक्षिका मीनाक्षी चौधरी यांनी केले.
या उपक्रमामुळे निवडणूक प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व व लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. शालेय जीवनातच अशी कृतिशील शिकवण मिळाल्यास विद्यार्थी भविष्यात सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला.