“ज्याला अक्रीत म्हणावं तसं घडतय, अनपेक्षित अशा दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे सातत्याने येणारे अनुभव पाहिले. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो. त्यामध्ये देखील सगळी धावपळ होते आणि हे जे काय असं अक्रीत घडतं हे बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत. डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले आहेत. तसेच, ज्याचं ज्याचं नुकसान झालं आहे, त्यांना व्यवस्थित नुकसानभरपाई किंवा अन्य बाबींची पुर्तता सरकारतर्फे केल्या जाईल. असं देखील मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगडमधील महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. ते दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत. येथील ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत आणि घडल्या तर त्यामध्ये जीवीतहानी होऊ नये, अशाप्रकारे आपण व्यवस्थापन करत आहोत. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यांच्याकडून व्यवस्थित मदत मिळत आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे आपली लोकं पोहचलेली आहेत. काही ठिकाणं कदाचित अशी असतीलही की तिथं पोहचणं अजूनही दुरापास्त आहे. त्या ठिकाणच्या रस्त्यांवरून मदतीसाठी माणसं जाऊ शकत आहेत, परंतु यंत्रसामुग्री अद्यापही जाऊ शकत नाही. बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर आपण केलेलं आहे आणि आजही अजुनही जिथे जिथे आवश्यकता असेल, त्यांचं स्थलांतर आपण करू.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही दिले.

Raigad landslide : ४४ मृतदेह काढले बाहेर; ५० पेक्षा जास्त माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

तसेच, ”हा पाऊस जो काय पडतो. वेध शाळा एक अंदाज व्यक्त करते, रेड अर्लट, ऑरेंज अर्लट आणखी काही अर्लट असतील ते.. पण त्याचं परिमान आणि प्रमाण हे कुणी ठरवू शकत नाही. ढगफुटी होईल का? ढगफुटी झाली तर ती कुठं होईल? काय प्रमाणात पाऊस पडेल? हे काही सांगता येत नाही आणि या गोष्टी लक्षात घेऊन, हा जो आपला किनारपट्टा आहे आणि काल रात्री व सकाळी देखील, नाही म्हटलं तर एक खूप तणाव खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात होता. कारण कोयनाचं व अन्य धरणांचा विसर्ग जे पाणी सोडावं लागणार होतं व सोडावं लागलं. ते पाणी काही शहरांमध्ये घुसलं. कोकणात पडणार पाऊस व त्यामधून हा सगळा होणारा, संहार पाहिल्यानंतर त्याबाबत देखील पाण्याच्या योग्य नियोजनाचा विषय विचाराधीन आहे. त्याबाबत देखील जल आराखडा करून, हे पाणी जे अचानक वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं. तर त्याचं व्यवस्थापन देखील करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने देखील सरकार काम करत आहे.” असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळला आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The chief minister reacted to the media after visiting the taliye village msr
First published on: 24-07-2021 at 15:19 IST