मराठा समाजाला आरक्षण देण्याप्रश्नी सरकार सकारात्मक असून कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीतील विविध मुद्द्यांचीही माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, टोकाचं पाऊल उचलू नये. आज मराठा समाजातील नेते आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु,त्यांनाच गावबंदी केली जात आहे. हे राज्याच्या हिताचं नाही. समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे, याची दखल मराठा समाजाने आणि मराठा नेत्यांनी घेतली पाहिजे आणि सरकारला वेळ दिला पाहिजे. आंदोलनाची दिशा भरकटली आहे. कोणत्याही समाजाची फसवणूक आम्ही करणार नाही. हा वेळकाढूपणा आम्ही करणार नाही. जे देणार ते टिकाऊ आणि नियमांत बसणारं देणार आहोत”, असं आश्वासन शिंदेंनी दिलं.

हेही वाचा >> मोठी बातमी! मराठा उपसमितीची बैठक संपली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

ते म्हणाले की, “मी सर्वांना शांततेचं आवाहन करतो. मनोज जरांगे पाटलांनी उपचार घ्यावेत. सरकारला अवधी दिला पाहिजे. जो अवधी वाढवून दिला आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर जुन्या नोंदी निष्पन्न होत आहेत.” “मराठा समाजाचे ५८ मोर्चे या राज्यात निघाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे मोर्चे निघाले. या मोर्चाला कुठेही गालबोट लागलं नाही. त्यामुळे लाखा लाखांचे मोर्चे काढून देखील कोठेही राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने काही लोक कायदा सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. जाळपोळ सुरू आहे. मला वाटतं मराठा समाजाने सजग होऊन याकडे पाहिलं पाहिजे. आंदोलनाला गालबोट लागल्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण झाली आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मराठा समाज बांधवांना विनंती आहे की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका. मुलाबाळांचां आईवडिलांचा विचार करा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका. त्यांना भावनिक आवाहन करतो. आम्ही देणारे आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोणालाही फसवू शकणार नाही, फसवणार नाही, फसवू इच्छित नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.