या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालकमंत्र्यांकडून वैद्यकीय महाविद्यालय, शल्य चिकित्सालय, सामाजिक भवन, क्रीडा संकुल उभारण्याचे सूतोवाच

पालघर: कृषी, क्रीडा, शिक्षण, आदिवासी विकास यासह इतर अनेक क्षेत्रात पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून देशातील एक सर्वोत्तम जिल्हा मुख्यालय कार्यान्वित होण्याच्या स्थितीत असून जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी उपयुक्त होणार आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, शल्य चिकित्सालय, सामाजिक भवन, आदिवासी भवन, क्रीडा संकुल इत्यादी वस्ती उभ्या राहणार असून होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्यास मदत होईल असा विश्वाास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिना निमित्त मूख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री भूसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी यावेळी करण्यात आली. नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये विविध कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील एकुण १०६५  शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता पिक पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७२८१ लाभधारकांनी विविध फळपिकांची ३५५८.०७ हेक्टर वर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याचे भुसे यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत २५,७५९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये ६८,८४३ कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा पुरविण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्हा वनहक्क समिती कक्ष स्थापन करून वनहक्क दावे मंजुरीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. जिल्ह्यात वनहक्क कायदयांतर्गत आजअखेर ४४५२२ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून त्याचे क्षेत्र ५०३८५ एकर इतके आहे. मागिल ४ महिन्यात ४२२९ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करून, आदिवासींना हक्क देण्यात आले असल्याचे भुसे यांनी सांगितले.

नविन शासकीय इमारतीची पाहणी

पालघर: पालघर जिल्ह्यााचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी निर्माणाधीन जिल्हा मुख्यालयाच्या शासकीय इमारतीची २६ जानेवारी रोजी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक कार्यालय, सत्र न्यायालय, प्रशासकिय इमारत अ आणि ब, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवास व्यवस्था, गेस्ट हाऊस, ऑडिटोरियम, चार व्ही.आय.पी बंगले एवढ्या शासकिय इमारती १०३ हेक्टर क्षेत्रफळामध्ये उभारल्या जात आहेत. या निर्माणाधिन कामाची पाहणी पालकमंत्री दादा भूसे यांनी करून या इमारतींचे काम पुन: होण्याच्या बाबत आढावा घेतला.

१७,५०० जणांच्या लसीकरणाचे लक्ष

जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड १९,५०० लस प्राप्त झाली असून सतरा हजार चारशे अकरा व्यक्तींना लस देऊन उद्दिष्टआहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात आली आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करून कोव्हिड रुग्णाच्या संख्येत नियत्रंण आणण्यात आले आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्ण बरे होण्यामध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The district moving towards development akp
First published on: 28-01-2021 at 01:16 IST