देशात रक्तसंकलनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, सध्याच्या करोनाच्या काळात या संकलनामध्ये बरेच अडथळे झाले आहेत. त्यामुळे राज्यात रक्ताची टंचाई देखील निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी राज्य शासन आता फेसबुकची मदत घेणार आहे. त्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. जागतिक रक्तदाता दिनाच्या दिवशीच शासनाने याची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या उपक्रमासंदर्भात माहिती देताना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं की, “करोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात रक्ताची गरज असणाऱ्यांना वेळेवर रक्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबिरांसोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील ७१ शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे. एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासल्यास ती पेढी फेसबुक पेजवर तशी मागणी करेल आणि शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश जाईल.” आवश्यक त्या गटाचे रक्त वेळीच उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमांचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा विश्वासही डॉ. व्यास यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या उपक्रमाबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी फेसबुकचे सहकार्य घेण्यात येईल, अशी महाराष्ट्र शासन घोषणा करीत आहे. ७१ सरकारी रक्तपेढ्या या फेसबुकच्या रक्तदान व्यासपीठावर नोंदणीकृत होतील. याद्वारे त्या ४५ दशलक्ष रक्तदात्यांपर्यंत पोहोचतील. फेसबुकने ही सेवा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!”

यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “जागतिक रक्तदाता दिनानिमित्त राज्यातल्या रक्तदात्यांचे आभार. महाराष्ट्रात स्वयंस्फूर्तीने रक्तदानाचे प्रमाण देशात सर्वाधिक असून रक्तसंकलनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government will take the help of facebook to overcome the blood shortage in the state aau
First published on: 15-06-2020 at 14:44 IST