वाई : साताऱ्यातील जलमंदिर परिसरातील बाजीराव विहीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुरातन विहिरीचे छायाचित्र राष्ट्रीय पोस्ट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याने पोस्टकार्डवर छापण्यास सुरुवात केली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद व सातारच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचा सन्मान असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. बाजीराव विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र बारव संवर्धन समितीचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे, राजेश कानिम, शैलेश करंदीकर, धनंजय अवसरे, हेमंत लंगडे यांनी बहुमोल सहकार्य केले आहे.

उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याच व्यक्तींच्या पुढाकाराने सातारा वारसा संवर्धन ग्रुप समितीच्या माध्यमातून बाजीराव विहिरीची स्वच्छता जपली जाते. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ विहिरीच्या छायाचित्राचा समावेश पुस्तिकात करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक, अमरावती, पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रत्येक एका स्टेपवेलचा समावेश आहे. तर, परभणी जिल्ह्यातील चार स्टेपवेल अशा एकूण आठ स्टेपवेलचा समावेश यंदा होऊ शकला आहे. त्यामध्ये सातारच्या बाजीराव विहिरीच्या छायाचित्र पोस्टकार्डवर प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा >>> सोलापूर : मोकाट व भटके कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी प्रशासनाला आली जाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली. यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकवला गेला. त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहिर  बांधण्यात आली होती. ही बाजीराव विहिर १०० फूट खोल आहे, तर हीचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे. या विहिरीस ९ कमानी आहेत, तसेच या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे दगडामध्ये राजचिन्हांसह शिल्प कोरण्यात आलेले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत. पूर्वी ज्यावेळी कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच बाजीराव विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जात  होते.