कोल्हापूर : मुंबईवरून आणलेल्या कोल्हापूरच्या राजाचे स्वागत करवीर नगरीत दिमाखात, अत्यंत जल्लोशात आणि अभूतपूर्व गर्दीत काल रात्री झाले.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २०१२ मध्ये मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमूर्ती गोल सर्कल मंडळाला दिली.
या माध्यमातूनच ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली. मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा राज्यातील पहिलाच गणपती आहे. मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी यांनी बनवलेली ही मूर्ती आहे.
कोल्हापूरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर दुपारपासूनच तावडे हॉटेल चौकात जमले होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पुष्कराज क्षीरसागर, गोल सर्कल मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. उद्देश सार्थकी –उदय सामंत
‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागला. कोल्हापूरच्या राजाचे आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंडळाच्यावतीने मंत्री उदय सामंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.