एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय नेत्यांची लगबग वाढू लागली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापुरात येऊन पक्षाच्या सभा-बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर शेजारच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत धवल यश मिळविल्यानंतर नवचैतन्य पसरलेल्या काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेते एकत्र आले.

महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  सोलापूर राखीव लोकसभेची जागा लढविण्यावरून गेल्या तीन महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू असतानाच काँग्रेसच्या निर्धास्त मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेची सोलापूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास स्पष्टपणे नकार तर दिलाच; पण सोलापूरची जागा तर सोडाच; पण राष्ट्रवादीच्या वाटय़ाला असलेल्या माढा लोकसभेच्या जागेवरही पटोले यांनी दावा सांगितला. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व अकरा जागा लढवून जिंकण्यासाठीही पटोले यांनी पक्ष कार्यकर्त्यांना हाक दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या सुप्त संघर्षांत उद्धव ठाकरेप्रणीत शिवसेनेने उडी घेतलेली दिसत नसली तरीही ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आपला कौल सुशीलकुमार शिंदे यांच्या बाजूने यापूर्वीच जाहीरपणे दिला आहे.

 सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने सोडावी म्हणून राष्ट्रवादीने आतापर्यंत आग्रह केला नाही. मात्र सुशीलकुमार शिंदे यांचेच एकेकाळी विश्वासू अनुयायी मानले गेलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सुशीलकुमारांची साथ सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीने सोडवून घ्यावी, आसा धोशा लावला आहे. त्यास राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी समर्थन दिल्यामुळे त्यास युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यातूनच शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे आमदार रोहित पवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यात संघर्ष झाला. ही गोष्ट तशी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घडलेली. नंतर हा सुप्त संघर्षांचा मुद्दा शीतपेटीत बंद झाला होता. परंतु मागील १५ दिवसांत हा मुद्दा पुन्हा शीतपेटीतून बाहेर येत उफाळून आला आहे.

या राजकीय संघर्षांत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मर्जीत राहिलेले आणि नंतर त्यांच्यापासून दुरावलेले माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे, दुसरे माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया आणि काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या भूमिका महत्त्वाच्या मानल्या जातात. यात महत्त्वाचे म्हणजे राजकारणात विश्वासार्हता गमावून बसलेले महेश कोठे यांना शरद पवार यांचा विश्वास पुन्हा संपादन करून आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची संपूर्ण सूत्रे ताब्यात ठेवायची आहेत. दुसरे माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी विराजमान व्हायचे आहे. तर सुधीर खरटमल यांची आगामी सोलापूर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवायची तीव्र इच्छा समोर आली आहे.

शिंदे यांची भूमिका महत्त्वाची

या मुद्यावर सुशीलकुमार शिंदे यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. लागोपाठ लोकसभेच्या दोन पराभवांमुळे राजकीय निवृत्तीचे स्पष्ट  संकेत शिंदे यांनी दिले होते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुशीलकुमारांचे महत्त्वही हळूहळू संपत असताना इकडे सोलापुरात काँग्रेसची ताकद उत्तरोत्तर घटत गेली आहे. जिल्ह्यात एकूण विधानसभेच्या एकूण अकरापैकी केवळ एकमात्र जागा सुशीलकुमारांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसकडे शिल्लक राहिली आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसही कमजोर झाली आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत निर्विवाद बहुमत काँग्रेसने स्पष्ट बहुमत संपादन केल्यानंतर इकडे सोलापुरात काँग्रेसलाही पुन्हा उभारी घेण्याच्या दृष्टीने बळ आले आहे. पक्षाच्या निर्धार मेळाव्यात हेच चित्र पाहायला मिळाले. यत भर म्हणून भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच निर्धार मेळाव्यात काँग्रेसअंतर्गत नाराजीनाटय़ही घडले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यातील मतभेद काही केल्या थांबायला तयार नाहीत. आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रभाव राहिलेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांना बसण्यासाठी एका कोपऱ्यात खुर्ची मिळाली होती. शिष्टाचार म्हणून विचार करता हा मुद्दा औचित्यभंगाचा ठरला. त्यामुळे साहजिकच धवलसिंह मोहिते-पाटील मेळाव्यातून निघून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपकडून मोर्चेबांधणी

दुसरीकडे भाजपने आगामी सर्व निवडणुका यशस्वीपणे जिंकण्यासाठी सूक्ष्म नियोजन यापूर्वीच हाती घेतले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीत या नियोजनाचा मागोवा घेण्यात आला. भाजपमध्ये कितीही गटबाजी असली तरीही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याची क्षमता दोन्ही काँग्रेससह उद्धव ठाकरे गटाकडे दिसत नाही. स्मार्ट सिटी प्रकल्प, पाच वर्षांपासून रखडलेली आणि आर्थिकदृष्टय़ा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना, गेले चार महिने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, महापालिका प्रशासकाचा ढेपाळलेला कारभार, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रखडलेला विकास व इतर स्थानिक जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर सत्ताधारी भाजपला अडचणीत आणता येऊ शकेल. परंतु त्यावर आवाज उठवायला महाविकास आघाडी कमी पडत आहे.