रत्नागिरी :मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डयांनी सर्वांना बेजार करुन सोडले असताना याबरोबर रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छ आणि सुंदरतेचा ढोल पिटणारी रत्नागिरी नगर पालिकेने याकडे डोळेझाक केल्याने वाहन चालक व नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा कधी सुधारणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती पहावयास मिळत आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही दयनीय स्थिती कधी सुधारणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता श्रावणातील विविध सण साजरे केले जाणार आहेत तसेच कोकणचा गणेशोत्सवही काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवून येणा-या गणेशाची स्वारी निर्विघ्नपणे घरी आली पाहिजे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. स्मार्टसिटी म्हणून निवड झालेल्या रत्नागिरी शहरातील रस्ते सुधारले नाहीत तर पर्यटन व्यवसायालाही फटका बसण्याची शक्यता आहे. रामआळी, मारूती आळी, एसटी स्टॅंड, काँग्रेस भुवन, टिळकआळी या सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे.
रत्नागिरी शहरात साळवीस्टॉपपासून मारूती मंदिरपर्यंत दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण झाले आहे; मात्र मारूती मंदिर ते ८० फुटी महामार्गापर्यंत एका बाजूने काँक्रिटीकरण पूर्ण झाले. आता एका बाजूचे काँक्रिटीकरण होणे बाकी आहे. कोणत्या कारणास्तव हे काम रखडले आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यास नगरपालिका तयार नाही. जिल्ह्याची कपडे, गृहोपयोगी साहित्य, दागिने व अन्य वस्तूंची मुख्य बाजारपेठ मानली जाणाऱ्या रामआळीतील खड्ड्यांची स्थिती तर फारच दयनीय आहे. खड्ड्यांमुळे ग्राहक या रस्त्यावरुं न येणेच पसंत करतात. यामुळे व्यापारी वर्गाला याचा फटका बसत असल्याने व्यापारी लोकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे गाड्यांची कामे निघाली आहेत. अनेक वाहनचालकांची हाडे खिळखिळी झाली आहेत, अशी चर्चा नाक्यानाक्यावर ऐकू लागली आहे. खड्ड्यांत पावसाळी डांबर नाही फक्त लाल डबर टाकल्याने पुन्हा चार दिवसांनी खड्डे मोठे होत आहेत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा पाहणार कोण? आम्ही कर कशासाठी द्यायचा? अशा तीव्र भावना लोकं बोलून दाखवत आहेत. नगरपालिकेवर प्रशासक आहेत. मात्र कोणाचे तरी हित संबंध जपण्यासाठी शहरातील रस्त्यांची कामे एकाच कंपनीला दिली जातात. वारंवार या अशा कंपनी कडून रस्त्यांची निकृष्ट कामे केली जातात. तरीही त्याच त्याच कंपनीला कामे देण्याचे काम केले जात आहे.
याविषयी विरोधक प्रशासकाकडे निवेदने देत आहेत; मात्र कार्यवाही होत नसल्याबाबत नागरिक ही संतापले आहेत. सिमेंटचे करताना शहरात मारुती मंदिर, जेल नाका, जयस्तंभ, बस स्थानक व आठवडा बाजार अशा ठिकाणी रस्त्याला चढ उतार असल्याने अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत. शहरातील दुर्दशा झालेले रस्ते करण्यासाठी पालिका कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
जयस्तंभ येथे जवळपास पाच ते सहा फुटाचा खड्डा नसून, खंदकच म्हणावा अशी परिस्थिती या रस्त्यांची आहे. येथून जाताना वाहनचालक अक्षरश: पालिका व ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडतात. गोखलेनाक्यावरून मारूती आळीतून जाणाऱ्या या रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचले आहे. गेल्या आठवड्यात यावर खडी, डांबर आणून खड्डे बुजवले तरी पुन्हा खड्डे पडले असल्याने पालिकेने फक्त नागरिकांना खुश करुन ठेकेदारांची आर्थिक वाढ केली असल्याने नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
सुंदर रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी हे स्वप्न शहरामधील रस्त्याची अवस्था पाहता अपुरेच राहिलेले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात खड्ड्यांमुळे झालेल्या एका अपघातात पादचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. शहरामधील काही रस्त्यांवर तर वाहन चालवणे सोडाच, नागरिकांना चालणेही कठीण झालेले आहे.- प्रल्हाद सावंत, रत्नागिरी
पावसाचा जोर कमी झाला की, रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास सुरवात करू, असे आश्वासन मुख्याध्याकाऱ्यांनी दिले आहे. तसेच कर्ला-जुवा-आंबेशेत रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील, असेही त्यांनी सांगितले. – प्रशांत साळुंखे, शहरप्रमुख, ठाकरे शिवसेना