लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : पारंपारिक लावणी कलेचा मनमुराद लुटण्याची मक्तेदारी फक्त पुरूषांची मानली जाते. परंतु अकलूजमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती सोहळा समितीने आयोजिलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धा पाहण्याचा पहिला मान फक्त महिला रसिकांना मिळाला. लावणीला दाद देताना पुरूष मंडळी डोक्यावरचे फेटे किंवा टोप्या उडवतात. शिट्ट्या मारतात. पण महिला रसिकांनी लावणीला भरभरून दाद देताना चक्क रूमाल उडवले आणि पेनांच्या टोपणांचा वापर करून शिट्ट्या मारल्या.

अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती भवनात सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे बंधू मदनसिंह यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विविध नामवंत १८ लावणी नृत्य संघ उतरले आहेत.

आणखी वाचा-महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी गेल्याने बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या कार्यक्रमावर पालकमंत्री, खासदारांचा बहिष्कार

या स्पर्धेची सुरूवात होऊन त्यात पहिल्या दिवशी लावणीचा आनंद लुटण्याची संधी महिला रसिकांना मिळाली. इश्कबाजीसह उत्तम नजाकती आणि अदाकारीने नटलेल्या लावण्या प्रत्यक्ष पाहताना महिला रसिकांना हातातील रूमाल उडविण्याचा मोह आवरता आला नाही. लावणीला दाद देताना पुरूष रसिक शिट्ट्या वाजवितात. महिलांनी शिट्ट्या वाजविण्यासाठी पेनांच्या टोपणांचा आधार घेतला होता. महिलांनी जल्लोष करीत लावणी नृत्यांगनांच्या कलेला दिलखुलास दाद दिली. नृत्यांगनांनीही रंगमंचावरून खाली उतरत थेट महिला रसिकांमध्ये भिडत, शैलीदार नृत्याविष्कार पेश केला. तेव्हा अवघे सभागृह उत्साही जल्लोषात डुंबून निघाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, अकलूजमध्ये यापूर्वी सलग २७ वर्षे राज्य लावणी स्पर्धा भरवून प्रत्येक वर्षी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती लावणी पुरस्कार देणारे जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आतापर्यंतच्या लावणी पुरस्कार मानकरी लावणी नृत्यांगनांच्यावतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. संयोजक स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.