राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडल्याने दोन्ही गटांतला संघर्षही अनेकदा पाहण्यास मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार यांनी जनतेला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं होतं. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांनी पत्रात काय म्हटलं आहे?

सन १९९१ पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरंतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.

संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल या वरच कायम माझा भर राहिला.

पहाटे पाचपासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला.

पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल. काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.

जितेंद्र आव्हाडांनी काय टीका केली?

“१९९१ मध्ये ते राजकारणात आले त्यांनी काय काय बोलून दाखवलं? एखाद्या माणसाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की मी शरद पवारांनी मला राजकारणात आलो. त्याऐवजी अजित पवार काय म्हणतात मी अपघातानेच राजकारणात आलो. महाराष्ट्राला एका तरुण नेतृत्वाची गरज होती, ती गरज मी येऊन पूर्ण केली आहे. अशा प्रकारे ते म्हणत आहेत. शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागतं आहे. कारण कृतीतून काहीही दिसत नाही.” असं म्हणत आव्हाड यांनी टीका केली आहे.

हे पण वाचा- “वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…”, पक्षचिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाडांचा नवा नारा

तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील

“असं कुठे असतं का? की सत्तेशिवाय कामं करता येत नाहीत. सत्तेशिवाय विकासच होत नाही. विरोधक आणि सत्ताधारी ही लोकशाहीची दोन चाकं आहेत. पण यांना सत्तेशिवाय कधी जगताच येणार नाही. अशा प्रकारची भूमिका असेल तर काय बोलणार? एक वाक्य अजित पवार कायम वापरतात. सत्तेशिवाय शहाणपण नाही असं कायम म्हणतात. उद्या आम्ही सत्तेत आलो तर उद्या हे शरद पवारांच्या घरी जातील, साहेब सत्ता आली मला तुमच्याबरोबर घ्या असं म्हणत त्यांच्या पायाशी बसतील. असं होत नसतं हो. ज्या देवेंद्र फडणवीसांसह ते गेले आहेत ते २०१४ पर्यंत ताकदीने विरोधात राहून लढले. अजित पवारांनी काही गोष्टी त्यांच्याकडूनही शिकल्या पाहिजेत असं मला आज वाटतं आहे.” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then ajit pawar will come and sit at sharad pawar feet said jitendra awhad scj
First published on: 27-02-2024 at 10:54 IST