महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार भविष्यात पंतप्रधाननही होऊ शकतील, असा मोठा दावा राज्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केला आहे. शरद पवारांसारखा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होऊ शकतील, असा दावा केला आहे. टीव्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“ईडीच्या भीतीने लोक आज सोडून चालले आहेत. पण त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की तुम्ही कुठेही जा, मी माझा पक्ष वाढवणार. याही वयात मी संपूर्ण महाराष्ट्र फिरणार. लोकांमध्ये जाणार. ज्यांना जायचं आहे, त्यांनी जावं. माझी कोणावर आडकाठी नाही. ही हिंमत ८२-८३ वयाच्या वर्षी आहे. असा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे. कुठेही काही नसताना आज दिल्लीत सर्वपक्षीय नेते त्यांना मानतात. काय सांगावं कदाचित होणाऱ्या निवडणुकीनंतर जर परिस्थिती बदलली तर ते पंतप्रधाननही होतील. कारण पंतप्रधानपदी असा माणूस मिळणं हे अवघड आहे”, असं यशवंतराव गडाख म्हणाले.
हेही वाचा >> “मर्द असाल तर…”, नैतिकतेच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले, “आमच्या मतांवर…”
म्हणून शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत
“शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी कामाला लागायची आणि दिल्लीतून त्यांचं नाव कापण्यात यायचं. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात पक्षांतर्गत निवडणूक झाली तेव्हा मी माझं मत पवारांना दिलं होतं. मात्र दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत”, असंही यशवंतराव गडाख म्हणाले.
दरम्यान, नुकतंच महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय नाट्य घडलं. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. परंतु, त्यांच्या घोषणेमुळे राज्यभर एकच कल्लोळ माजला. सर्वपक्षीय नेत्यांसह पक्षातील कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. अखेर, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या हट्टापुढे शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा लागला. त्यामुळे शरद पवार पुन्हा सक्रिय झाले असून महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.
