राहाता : मुंबईतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड शिर्डीतील ते राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीतून लंपास झाल्याची घटना नुकतीच घडली. शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने व्यापारी गेला सुमारे आठवडाभर शिर्डीत सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत.त्यासाठी त्यांनी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती. १३ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास ते हॉटेलच्या खोलीत झोपलेले असताना खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे विविध दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरीला गेला. व्यापाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हे व्यापारी मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत. त्यांच्याबरोबर त्यांचा कामगार आणि चालक, असे दोघे जण होते. ते अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते. १३ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास जेवण करून ते खोलीत झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग खोलीमधील खाट आणि टेबलाच्या मध्ये ठेवली होती. खोली आतून बंद होती. मालक व दोघे कामगार एकाच खोलीत होते.
व्यापाऱ्याचा चुलत भाऊ बुधवारी १४ मे रोजी त्यांच्याकडील रक्कम घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याला खोलीचा दरवाजा उघडा दिसला. आत पाहिले असता, चालक खोलीमध्ये नव्हता. त्याचा मोबाइल आणि कपडे खोलीमध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर व्यापाऱ्याने सोन्याच्या दागिन्यांची पिशवी तपासली असता, त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
तपासचक्र वेगाने
याप्रकरणी अहिल्यानगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी शिर्डीला आले असून, त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हॉटेल परिसरातील; तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज, कॉल डिटेल्स आणि परिसरातील इतर माहिती गोळा केली जात आहे.
तपासासाठी एक पथक पुणे येथे, तर छत्रपती संभाजीनगर व मुंबई या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. शिर्डी पोलिसांचे एक पथक स्थानिक पातळीवर तपास करीत आहे. या घटनेची लवकरच उकल करण्यात यश येईल.- रणजित गलांडे – पोलिस निरीक्षक, शिर्डी