लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : विटा येथे मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या मुंबईतील संशयितासह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. विटा येथे आठ दिवसांपूर्वी मेफेड्रोन अमली पदार्थ तयार करणारा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त करून तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी तिघांना अटक करण्यात आल्याचे घुगे यांनी सांगितले.

विटा येथे ३० कोटींचा एमडी अमली पदार्थ हस्तगत करून यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रहुदीप बोरिचा, सुलेमान जोहर शेख व बलराज कातारी यांचा समावेश होता. न्यायालयाने तिघांनाही दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक चौकशी करत असताना आणखी तिघांचा सहभाग आढळून आला.

नव्याने अटक केलेल्यांमध्ये जितेंद्र शरद परमार (वय ४१, सुमंगल सोसायटी, नागडोंगरी, ता. अलिबाग), अब्दुलरजाक अब्दुलकादर शेख (वय ५३ रा. पठाणवाडी, पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय ३४ रा. शेणे, ता. वाळवा) यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापैकी परमार याने विट्यात ड्रग्जचा कारखाना सुरू करण्यास आर्थिक मदत केली असून अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री दिल्ली येथे मागवून कंपनीला पैसे देण्यात आले होते. तसेच अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ गुजरातमधून मागविण्यात आले होते. अशी माहिती संशयितांनी दिली आहे. तर अमली पदार्थ तयार करण्यासाठी सरदार पाटील याने मार्गदर्शन केले होते. स्थानिक संशयित कातारी हा तयार माल मुंबईतील शेख याच्या हाती सुपूर्द करणार होता, अशी माहिती तपासात समोर आली असल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले.