सांगली : तीन दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात समोर आली. मुलाला पळवून नेणार्या महिलेचे छायाचित्र पोलीसांच्या हाती लागले असून तिचा शोध युध्दपातळीवर घेण्यात येत आहे.
कविता समाधान अलदर (रा. डिसकळ, ता. सांगोला) ही महिला प्रसुतीसाठी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल झाली होती. दि. १ मे रोजी महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ-बाळंतिनला रूग्णालयातील आंतररूग्ण विभागात १६ नंबरच्या खाटेवर ठेवण्यात आले असून बाळ-बाळंतिन सुखरूप होते. दरम्यान, महिलेसोबत असलेल्या आजीशी एका अनोळखी महिलेने ओळख करून घसट वाढवून माझी चुलत बहिण रूग्णालयात दाखल आहे. तिच्या सेवेसाठी आपण असल्याचे सांगत विश्वास संपादन केला.
शनिवारी सकाळी ११ वाजणेच्या सुमारास नवजात बालकाला लस देउन आणतो म्हणून या महिलेने मातेपासून बाळ नेले. बराच वेळ महिला बाळासह परत आली नाही. यामुळे नातेवाईकांनी महिलेचा रूग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला आणि नवजात अर्भक कुठेच आढळून आले नाही. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनाकडे याची तक्रार करून पोलीसांनाही याची माहिती दिली आहे.
पोलीसांनी रूग्णालयात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून बाळाची चोरी करणार्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला आहे. विविध ठिकाणी असलेल्या कॅमेर्यामधून ही महिला बाळाला घेउन रूग्णालयाबाहेर असलेल्या रिक्षातून कोल्हापूर रस्त्यावरून गेल्याची माहिती पोलीसांच्या तपास पथकाला मिळाली आहे. या माहितीच्या आधारे संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांने या महिलेला कोल्हापूर रस्त्यावरील अंकली फाटा येथे सोडण्यात आले असल्याचे सांगितले.
दरम्यान, याबाबत रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता सहायक अधिष्ठात डॉ. रूपेश शिंदे आणि अधिष्ठात डॉ. प्रकाश गुरव हे दोघेही रजेवर असल्याची माहिती मिळाली. मात्र बाळचोरीचा प्रकार समोर आल्याचे मान्य करण्यात आले. रूग्णालयाच्या आंतररूग्ण परिसरात सुरक्षा रक्षक तैनात असून रूग्णाच्या नातेवाईकांनाही बर्याचवेळा अडवून ठेवण्यात येते. मात्र, आर्थिक फायदा झाला तर कोणालाही सहज प्रवेश देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
मिरज वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातून बाळाची चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या महिलेच्या बाळाची चोरी झाली ती सकाळपासून बाळासाठी आक्रोश करत आहे, तर आजीनेही आक्रोश मांडला आहे. सायंकाळपर्यंत बाळ आणि बाळाची चोरी करणारी महिला यांचा पोलीसांना शोध लागलेला नव्हता.