पंढरपूर : सामाजिक, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, व्यसनमुक्ती आदी सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या तीन दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
पंढरीच्या पायी वारीस प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या सोहळ्यातून सामाजिक, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यांसारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. दिंडीची परंपरा सोबत सामाजिक भान राखावे हा उद्देश आहे. यातूनच ही पुरस्काराची संकल्पना पुढे आली आहे.
आषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा योग्य असा सन्मान व्हावा. त्याचप्रमाणे इतर दिंड्यांनीही त्याचा आदर्श घेऊन या निर्मल वारी, हरीत वारी अभियानामध्ये सहभाग घ्यावा. या जाणिवेतून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रा कालावधीत ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’ सुरू करण्यात आला. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या पुरस्काराचे ८ वे वर्ष आहे.
आषाढी पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह तसेच पहिल्या क्रमांकाच्या दिंडीला १ लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाला ७५ हजार तर तिसऱ्यासाठी ५० हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲड. माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, वृक्षमित्र ह.भ.प. शिवाजीराव मोरे या मंदिर समितीच्या तीन सदस्यांची समिती या बाबत निर्णय घेणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.