परभणी : एका जागेवरून पानटपरी हलवून बैलगाडीमध्ये दुसऱ्या जागी नेल्यानंतर ती बैलगाडीतून उतरवत असताना गाडीच्या लोखंडी दांड्या विजेच्या तारेला लागल्याने तब्बल तीन जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या घटनेतील अन्य तिघांना लोहा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना पालम शहरात रविवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की पालम शहरातील शेख शफीक शेख मुसा (वय ३१ वर्षे) यांचा पान टपरीचा व्यवसाय होता. लोहा रोडवर त्यांची पान टपरी होती. ही पानटपरी बैलगाडी मधून पालमच्या बालाजी नगरात हलवण्यासाठी त्यांनी सायंकाळी बैलगाडी आणली होती. शेख शफीक हे पालमच्याच बालाजी नगरात राहतात. लोहा रोडवर ही पान टपरी बैलगाडीत चढवण्यात आली त्यानंतर बालाजी नगरात ही बैलगाडी आली. यावेळी पान टपरी खाली उतरवत असताना बैलगाडीच्या दांड्या वर झाल्या. या दांड्या लोखंडी होत्या. विजेच्या तारेला या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाल्याने बैलगाडीत असलेल्याना विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा धक्का एवढा जबर होता की त्यात सिद्धार्थ नरहरी बावळे, (वय ३५ वर्ष, राहणार जवळा, तालुका पालम) शेख शफीक शेख मुसा (वय ३१ वर्षे) शेख शौकत शेख मुसा (वय ४० वर्षे, दोन्ही राहणार बालाजी नगर, पालम) हे तिघेही जण विजेच्या धक्क्याने मृत्यू पावले. या ठिकाणी असलेल्या अन्य तिघांनाही विजेचा धक्का बसलेला होता. या तिघांना आता लोहा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या जखमींमध्ये शेख फरहान शेख महेबूब (वय १६ वर्षे), शेख शाखेर शेख, शेख असलम शेख गुड्डू (आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी आहेत. त्यांच्यावर साई हॉस्पिटल लोहा येथे उपचार चालू आहे.