scorecardresearch

Premium

हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा कट ?

बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, स्फोटांची तीव्रती कमी असणार होती. फक्त गोंधळ निर्माण करणे इतकाच त्यांचा उद्देश होता.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनादरम्यान स्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठीच हे स्फोट घडवले जाणार होते आणि या स्फोटाद्वारे सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहितीही उघड झाली आहे.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा आणि राज्याच्या अन्य भागांमधून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक केली. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर अशी या तिघांची नावे आहे. या तिघांकडून पोलिसांनी गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जिवंत काडतुसे जप्त केली होती.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे हल्ला घडवण्याचा कट रचत होते. बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, स्फोटांची तीव्रती कमी असणार होती. फक्त गोंधळ निर्माण करणे इतकाच त्यांचा उद्देश होता. मराठा मोर्चाजवळच हा स्फोट घडवून सरकारला इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चौकशी दरम्यान एका संशयिताने पोलिसांना सांगितले की, मराठा आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हे स्फोट घडवले जाणार होते.

सुधन्वा गोंधळेकर हा मराठा आंदोलनांवर लक्ष ठेवून होता. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या अनेक व्हॉट्स अॅप ग्रुपमधील तो सदस्य होता. या मोर्चांना पाठिंबा देण्यासाठीच त्याने स्फोट घडवण्याचा कट रचला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपींच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सुधन्वा गोंधळेकर हा पूर्वी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता होता, अशी माहितीही समोर येत असून संभाजी भिडे यांनी देखील मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे. तिन्ही संशयितांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि मेसेज मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत असून त्या तिघांनी जिथे जिथे भेट दिल्याचा दावा केला आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे कामही पोलिसांनी सुरु केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three men from hindu groups arrested by ats planned setting off bombs near maratha morchas

First published on: 16-08-2018 at 08:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×