सावंतवाडी : निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुन्हा एकदा आपल्या समृद्ध वनसंपदेची साक्ष दिली आहे. जिल्ह्यात तीन नवीन दुर्मिळ वनस्पतींचा शोध लागला आहे. यात भूईचाफा, चिकट मत्स्याक्षी आणि गाठी तुळस या वनस्पतींचा समावेश आहे. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ विजय पैठणे यांच्या विद्यार्थ्यांनी या वनस्पतींचा शोध घेतला आहे.
जिल्ह्यात बाराशे प्रकारच्या विवीध वनस्पती आढळून येतात यात आता आणखिन तीन नवीन वनस्पतींचा समावेश होणार आहे. प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे आणि त्यांचे विद्यार्थी २०१५ पासून सिंधुदुर्गच्या वनसंपत्तीचा सखोल अभ्यास करत आहेत. या अभ्यासातून या तीन अंत्यत दुर्मिळ वनस्पतींचा शोध लागला आहे.
केमेफेरीया रोटूंडा एल ही अत्यंत दुर्मिळ अशी भुईचाफा वर्गात मोडणारी प्रजाती कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात आढळून आली आहे. सारिका बाणे या विद्यार्थ्यीनीने या वनस्पतीचा शोध घेतला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात ही वनस्पती पुणे परिसरात आढळून येत होती मात्र गेल्या काही वर्षात ती नामशेष झाली होती. २५ वर्षांनंतर ही वनस्पती पुन्हा आढळून आली आहे. भारतात भूईचाफ्याचे आठ प्रकार आढलून येतात यातील ही सर्वात दुर्मिळ प्रजाती ओळखली जाते.
चिकट मत्स्याक्षीचे १४ प्रकार भारतात आढळून येतात, यातील दोन पुर्वी महाराष्ट्रात आढळून यायच्या नंतर त्या नामशेष झाल्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनाळी गावात ही वनस्पती योगेश्री केळकर या विद्यार्थीनीने शोधून काढली आहे.
कुडाळ तालुक्यातील हमुरमाळा गावातील डोंगर परिसरात गाठी तुळस आढळून आली आहे. या रान तुळस असेही संबोधले जाते. पुर्वी अंदमान निकोबार,केरळ,त्रिपूरा, गोवा परिसरात ही तुळस आढळून येत असे, आता मात्र कोकणातही या तुळसीचे अस्तित्व दिसून आले आहे.या तिन्ही वनस्पतींचे शुष्क नमुने (हर्बेरियम) आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या ‘हर्बेरियम’ मध्ये जतन करण्यात आले आहेत, जेणेकरून भविष्यातील अभ्यासकांना या दुर्मीळ वनस्पती थेट पाहता येणार आहे अशी माहिती डॉ. विजय पैठणे यांनी दिली.