अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्र किनाऱ्यावर तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत शेतकरी कामगार पक्षाचे म्हसळा तालुक्याचे चिटणीस संतोष पाटील यांचे दोन तरुण मुलं अवधूत संतोष पाटील (वय २६) व मयुरेश संतोष पाटील (वय २३), तसेच त्यांचा मुंबई ऐरोली येथून आलेला पाहुणा हिमांशू संतोष पाटील (वय २१) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे तिघही समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना बॉल पाण्यात गेल्याने तो आणण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. दुर्दैवाने या तिघांना पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वेळास येथील स्थानिक तसेच दिवेआगर सरपंच व उपसरपंच यांनी तात्काळ चार ते पाच जेटस्की बोटी घटनास्थळी पाठवल्या.स्थानिक तरुण आणि दिघी सागरी पोलीस यांनी तिघांना बाहेर काढले.तीघांना बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले.परंतू नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अखेर तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे वेळास परिसरात शोककळा पसरली आहे.