कराड : भेकर व चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार उघडकीस आणताना वनखात्याच्या पथकाने आसाम रायफल या सैन्यदलातील बंदुकधारी (रायफलमॅन) युवराज निमन याचेसह अन्य दोघांना अटक केली. नारायण सीताराम बेडेकर व विठ्ठल किसन बेडेकर (दोघेही रा. ठोसेघर, ता. सातारा) अशी युवराज निमनच्या साथीदारांची नावे आहेत.

याबाबतची माहिती मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी दिली. त्यात म्हटले आहे, की सातारच्या माचीपेठेतील युवराज निमनच्या राहत्या घरावर उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज सोमवारी छापा मारला असता तेथे भेकर व चौसिंगा प्राण्याचे मुंडके व भेकराचे ताजे मांस, पायाचे खुर मिळून आले. युवराज निमनकडील अधिक चौकशीत त्याने या शिकारी ठोसेघर येथील नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर व स्वतः अशा तिघांनी मिळून केल्याचे सांगितले.

हेही वाचा: आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायणकडील सिंगलबोअर बंदुकीने आज सकाळी साडेसातच्या सुमारास भेकराची शिकार केली व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याच्या मटणाचे वाटे केले. त्यातील भेकराचे मुंडके, थोडे मांस हे निमनला मिळाले. कातडे सोलून ओढ्यात लपवण्यात आले. उरलेल्या मांसातील थोडा वाटा विठ्ठलला तर उरलेले सर्व मांस नारायण आपल्या घरी घेऊन आला. नारायणने हे मांस स्वतःच्या घरामागील शेणीखाली लपवून ठेवले. हे मांस साताऱ्यातील कोणा बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते व ते हे मांस रात्री घेवून जाणार होते असे नारायणने सांगितले. या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, एक एअरगन, सिंगलबोअर बंदूक, जिवंत काडतुसे, भेकर सोलण्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले मांस, कातडे हे घटनास्थळी संबंधितांनी दाखवलेले आहे. ते पंचासमोर जप्त करून वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे शिकारी सराईत असून, त्यांनी यापूर्वीही गुन्हे केल्याचे पुरावे वनविभागास मिळाले आहेत.