३५ ते ४० लोकांचा तपास सुरू

बोईसर : आढळलेला पहिला करोनाबाधित ही  बोईसरसाठी चिंतेची बाब असतानाही त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या तीन नातेवाईकांनाही करोनाचा संसर्ग झाल्याने ही चिंता वाढली आहे.

मुंबई-बोईसर प्रवास करणाऱ्या बोईसर येथील दलाल टॉवर भागातील ३५ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या १० लोकांना आरोग्य विभागाने तातडीने ताब्यात घेऊन त्यांचे अलगीकरण  केले होते. तर इतर संपर्कात आलेल्या ३५ ते ४० लोकांचा तपास सुरू करण्यात आला होता.

मंगळवारी तरुणाच्या कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगी व ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बोईसर भागात मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.  सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहेत. यातच इतर लोकांचे घेतलेले नमुने याचा अहवाल येणे बाकी असून  इतर संपर्कात आलेल्या लोकांचा तपास सुरू आहे.