तुळजापूरची तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. नवरात्र काळातील नऊ दिवस तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भक्तिला उधाण येते. इतर शक्तिपीठांमध्ये नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.  
तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होते. तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. या विधीस मोठे महत्त्व आहे.
बालाघाट डोंगर रांगाच्या यमुनाचलावरील तुळजापूर येथे निवासी असलेली तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महारांजांचे देखील आराध्य दैवत होती. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा कौल घेतल्याशिवाय कोणत्या ही मोहिमेवर जात नसत, असे म्हटले जाते. तुळजापूरस्थित भवानी मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. भवानी मातेचे मंदिर खोलगट भागात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी उताराचा रस्ता आहे.
मंदिरात प्रवेश करताच डाव्याहाताला तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झऱ्यांचे उगमस्थान असणारी ही तीर्थकुंडं कल्लोळतीर्थ व अमृतकुंड या नावांनी परिचित आहेत. मंदिराच्या उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. भाविक मंदिरात प्रवेश केल्यावर या सर्व देवतांचे दर्शन घेत दत्तपादुकांजवळ येऊन पोहोचतात. गाभाऱ्याजवळील गणेश मूर्तीचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर गाभाऱ्या समोरील पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती पध्दतीचे आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
भवानी मंदरामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेस देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये घटस्थापना केली जाते. त्या ठिकाणी धान्याची पेरणी करून नंदादीप प्रज्ज्वलित करण्यात येतो. पुढे उत्सव संपेपर्यंत तो तेवत असतो. नवरात्रोत्सव काळामध्ये देखील नेहमी प्रमाणेच देवीची दररोज दोन वेळा अभिषेक पूजा केली जाते. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा छबिना निघतो. प्रशाळपूजेनंतर देवीला विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन करण्यात येते. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
काही पारंपरिक भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. काही भक्त पालख्या आणतात, त्यांना पलंग म्हणतात. भिंगार येथून आलेल्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे.
तुळजापूरला विविध मार्गांनी जाता येते. महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून तुळजापूरला राज्य परिवहन मंडळाची बस अथवा खासगी वाहनाने देखील जाता येते. मुंबई ते तुळजापूर अंतर ४४२ किमी असून, मुंबईहून तुळजापूरला बसने जाण्यासाठी साधारण सात तास लागतात. तुळजापूरच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक उस्मानाबाद असून, ते अंतर १९ किमी आहे. सोलापूर रेल्वे स्थानकापासून तुळजापूर ४६ किमी अंतरावर असून, सोलापूर रेल्वेस्थानक हैद्राबाद, पुणे, नागपूर आणि बँगलोर या प्रमुख लोहमार्गांना जोडलो गेले आहे. विमान प्रवासाचा विचार केल्यास पुणे विमानतळ तुळजापूरचे नजिकचे विमानतळ आहे. पुण्याहून रेल्वे अथवा बसने तुळजापूरला जाण्याचा पर्याय आहे.  
प्रमुख शहरांपासून तुळजापूर प्रवासाचे अंतर
मुंबई ते तुळजापूर       – ४४२ किमी
पुणे ते तुळजापूर         – २९१ किमी
हैदराबाद ते तुळजापूर  – २८८ किमी
बेंगळुरू ते तुळजापूर     – ६७५ किमी